बापरे! ‘ते’ डॉक्टर किती रुग्णांच्या संपर्कात आलेत?
राजगुरूनगरमध्ये पाच डॉक्टर ‘कोरोना पॉझिटीव्ह’
हॉटस्पॉट बनतोय खेड तालुका
महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : खेड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. एकाच दिवशी ४५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. राजगुरूनगरमध्ये पाच डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ‘ते’ पाच डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या प्रशासनाच्या डोकेदुखीचा विषय झाला आहे. रुग्णसंख्या पाचशेच्या पार पोहचली आहे. समूह संक्रमणाच्या उंबरठ्यावर तालुका आहे. अजूनही नागरिक पुरेशी सतर्कता बाळगीत नसल्याचे बँकांमधून चित्र दिसत आहे.
राजगुनगर शहरामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असून आता खाजगी डॉक्टर्सच कोरोनाग्रस्त सापडल्याने उपचारासाठी संपर्कामध्ये येणारे नागरिक व त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. प्रशासन सर्वोतोपरी काळजी घेत असून नागरिकांना लॉकडाऊन व सरकारी नियमांचे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरीच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. खेड तालुक्यात ४५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यात चाकण शहरातील १२ नव्या पॉझीटीव्ह रुग्णांचा समावेश आहे.तसेच आसपास च्या गावांमध्येदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोनाचे वाढते संकट पाहता समूह संक्रमनाबाबत काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यात आतापर्यंत ५३७ जण कोरोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी ३०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. कोरोना बधितांची आकडेवारी वाढत असली तरी उपचारा नंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे . त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला घाबरुन न जाता योग्य ती काळजी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.