बापरे!…बँकेतील तेरापैकी दहा कर्मचारी कोरोनाग्रस्त; एकाचा मृत्यू; तरीही लोकांची झुंबड कायम
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : कोरोना महामारीने व्यापक रूप धारण केले आहे. याचे गांभीर्य मात्र नागरिकांना उरले नसल्याचे राजगुरूनगरमधील चित्र आहे. येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत तेरा कर्मचाऱ्यांपैकी तब्बल दहा जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, असे असतानाही या शाखेत नागरिकांची झुंबड उडाली आहे.
अनलॉकची प्रक्रिया सुरू असून आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन शासकीय यंत्रणा करीत आहे. मात्र या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत नागरिक बाहेर पडताना दिसतात. कोरोनाग्रस्तांचा आकडा प्रचंड वाढत असताना नागरिकांमध्ये गांभीर्य उरलेले दिसत नाही. राजगुरूनगरच्या स्टेट बँकेत तेरा पैकी दहा जण पॉझिटीव्ह आढळले. त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बँकिंग कामासाठी स्टाफ उपलब्ध नाही. असे असतानाही सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवीत लोक गर्दी करीत आहेत. हा प्रकार दुर्दैवी आणि कोरोनाला निमंत्रण देणारा आहे.