बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे पशुसंवर्धन मंत्र्यांचे आदेश : खासदार डॉ. अमोल कोल्हे
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
पुणे : बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे मंत्री श्री. सुनील केदार यांनी दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी लवकर व्हावी, यासाठी महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
पशुसंवर्धनमंत्री श्री. केदार यांनी आज ( दि. १३ ऑगस्ट ) बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याबाबत रणनिती ठरविण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकी विषयी डॉ. कोल्हे यांनी ही माहिती दिली. या बैठकीला माथाडी कामगार नेते श्री. नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरूटे, नितीन शेवाळे, धनाजी शिंदे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, अमोल हरपळे आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे, सहआयुक्त डॉ. प्रशांत भड, अवरसचिव डॉ. सं. श्री. पंचपोर, सहसचिव माणिक गुट्टे आदी उपस्थित होते.
बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्याने ग्रामीण अर्थचक्र थांबले आहे. शिवाय गावोगावच्या यात्रा ओस पडल्या आहेत. त्यामुळे या शर्यती पुन्हा सुरू करण्याची मागणी बैलगाडा मालक व संघटना सातत्याने करीत होत्या. बैलगाडा शर्यतबंदी हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचंड गाजला होता. शिरूर लोकसभेची निवडणूक बैलगाडा शर्यत व वाहतूक कोंडी या प्रश्नांभोवती फिरत होती. त्यामुळे निवडून आल्यावर डॉ. कोल्हे यांनी लोकसभेत सातत्याने ही बंदी उठविण्याची मागणी केली होती. आजच्या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी आपण करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी राज्य सरकारने बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या बाजूने नव्याने प्रतिज्ञापत्र करावे. त्यामध्ये शर्यतबंदीमुळे खिल्लारी बैलांची जात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भूमिका मांडावी. त्याचबरोबर आपली सांस्कृतिक परंपरा नष्ट होत आहे, ग्रामीण अर्थकारण अडचणीत आले आहे, या बाबी ठामपणे मांडल्या पाहिजेत असे सांगितले. त्याचबरोबर एकाच देशातल्या वेगवेगळ्या राज्यांबाबत सर्वोच्च न्यायालय घेत असलेली भूमिका अन्यायकारक आहे हेही ठासून मांडले पाहिजे, असे मत डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत व्यक्त केले.
पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने नवीन प्रतिज्ञापत्र सादर करा. त्यासाठी खासदार व बैलगाडा संघटनेने मांडलेले मुद्दे विचारात घ्या असे सांगितले. तसेच महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी आपण आज सुनावणी लवकर घ्यावी यासाठी चर्चा करू असे सांगितले. तसेच या संदर्भात नियमित बैठका घेऊन सुनावणी बाबतच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल असेही श्री. केदार यांनी सांगितले.
——