अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवसाय बंद : तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे… ● व्यवसायदारांकडून शासन नियमांची पायमल्ली… ● खेडमधील ९ व्यावसायिकांवर कडक कारवाईचे आदेश…३० एप्रिल पर्यंत दुकाने सील…
अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सर्व व्यवसाय बंद : तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे…
● व्यवसायदारांकडून शासन नियमांची पायमल्ली…
● खेडमधील ९ व्यावसायिकांवर कडक कारवाईचे आदेश…३० एप्रिल पर्यंत दुकाने सील…
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून; रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठा आकडा पार करत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काही व्यावसायिकांकडून पालन केले जात नसल्यामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून जिल्हाधिकारी पुणे यांच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेकडील आदेशानुसार, खेडमधील व्यावसायिकांवर संपूर्णतः बंदची कार्यवाही करण्याचे तात्काळ आदेश खेडच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिले आहेत.
राजगुरूनगर येथील पाबळ रोड वरील राक्षेवाडी हद्दीतील ओम साई मोबाईल शॉपी, स्वप्नपूर्ती मोबाईल शॉपी, सम्राट बँगल्स अँड जनरल स्टोअर्स, माही फूटवेअर, गणराज कलेक्शन, अविनाश गिफ्ट अँड स्टेशनरी हाऊस, अनिकेत फूटवेअर, खेड मार्केटयार्ड येथील ओमकार टेलर्स, जैदवाडी येथील पुणे-नाशिक रोड लगत सह्याद्री ढाबा या खाजगी व्यावसायिकांवर ५ व ५ पेक्षा जास्त लोकांना प्रवेश दिल्याने कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही या कारणाने पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग झाला आहे. त्यामुळे सदर व्यावसायिकांवर कडक कारवाई करून हे व्यवसाय ३० एप्रिल पर्यंत बंद करण्यात यावेत, असे आदेश खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांना देण्यात आले असल्याचे डॉ. वैशाली वाघमारे यांनी सांगितले.
या कठोर कारवाईमुळे इतर व्यावसायिकांनी प्रशासनाच्या नियम व अटीशर्थींचे पालन करून आपला व्यवसाय करावा व कोरोनाचा प्रसार रोखण्यास शासनाची मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.