Wednesday, October 8, 2025
Latest:
पुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

आता सातबारा उतारा लगेच मिळणार

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : तुम्हाला सातबारा उतारा हवा आहे.. तो ही लगेच.. त्यासाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. कारण आता ओटीपी बेस लॉगीनची व्यवस्था भूमी अभिलेख विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पोर्टलवर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकला, तरीही रजिस्ट्रेशन होईल. ओटीपी नंबर येईल, तो टाकल्यानंतर लगेच डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा मिळेल.

तसेच तुमच्या मोबाईल नंबरहून तुम्ही सातबारा उताऱ्यासाठी अधिकची रक्कम भरली असेल, तर राहिलेली रक्कम तुमच्या खात्यातच राहणार आहे. जेणेकरून पुन्हा कधी आवश्‍यकता वाटल्यास त्या रकमेतून सातबारा उतारा अथवा 8 अ चा उतारा काढणे शक्‍य होणार आहे. नागरिकांना गतीने सातबारा उतारा उपलब्ध व्हावा, यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

यापूर्वी डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारा अथवा 8 अ चा उतारा मिळण्यासाठी महाभूमी पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागत असे. त्यासाठी संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड क्रमांक, पॅनकार्ड नंबर, ई मेल आयडी आदी स्वरूपाची सर्व माहिती भरावी लागत होती. तसेच नोंदणी केलेल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा लॉगीन आयडी व पासवर्ड लक्षात ठेवावा लागत होता. तो विसरल्यास नागरिकांची अडचण होत होती. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आणि गतीने सातबारा उतारा मिळण्यासाठी मोबाईल नंबर आणि ओटीपी बेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना तत्काळ सातबारा उतारा मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सातबारा बाबत…
————————-
● राज्यातील एकूण सातबारे उताऱ्यांची संख्या – 2 कोटी 53 लाख
● डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा उताऱ्यांची संख्या – 2 कोटी 50 लाख
● डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध झालेल्या सातबारा उताऱ्याचे प्रमाण – 99 टक्के
● महाभूमी पोर्टलचे राज्यातील वापरकर्ते – 2 लाख 56 हजार
● महाभूमी पोर्टलवरून डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उतारा काढलेल्या नागरिकांची संख्या – 23 लाख
● यातून शासनाला मिळालेला महसूल – 3 कोटी 65 लाख

ओटीपी बेस लॉगीन या नवीन सुविधेमुळे महाभूमी पोर्टलवरून डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा आणि खाते उतारा काढणे आणखी सुलभ आणि गतीने होणार आहे. दोन दिवसांपासून ही सुविधा महसूल विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असून नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा. – रामदास जगताप ( राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प)

असा प्रकारे काढता येईल, सातबारा उतारा :-
———————-
digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारा नागरिकांना डाऊनलोड करून घेता येणार आहे. महाभूमी पोर्टलवर गेल्यानंतर ओटीपी बेस येईल. त्यावर तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमची नोंदणी होईल. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो टाकल्यानंतर आणि ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर तत्काळ सातबारा उतारा उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!