अष्टविनायक : रांजणगावचा महागणपती
महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.
रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला ‘महोत्कट’ असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर तसे अगदी साधे-सुधेच होते. परंतु, बदलासह आता मंदिरात आद्ययावत सोयींसुविधा करण्यात आल्या आहेत.
आख्यायिका
आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, “यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने “प्रणम्य शिरसा देवम्’ या श्लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला “त्रिपुरी पौर्णिमा’ म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला इथे खूप मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते, त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची इथे रीघ लागलेली असते.
इतिहास
या मंदिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे.
मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे, व गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे साहाय्य दिले आहे. माधवराव पेशव्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले.
मंदिर
येथील मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे(की तळघरात?) असल्याचे सांगितले जाते. तिला मोहोत्कट असे म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो.
भौगोलिक
श्री महागणपती (रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) ः पुणे-नगर महामार्गावर पुणे-वाघोली-शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे २१ किलोमीटरवर तर पुण्यापासून ५० किलोमीटरवर आहे.
शिरूर आणि पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी एसटीची सोय आहे, तसेच नगरमार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावला उतरता येते