अष्टविनायक : लेण्याद्रीचा गिरिजात्मज
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरावर एका गुहेत आहे. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज (पुत्र) म्हणून ‘गिरिजात्मज’.
पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. असा समज आहे की पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली त्याच गुहेमागे एका गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे.
हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. ही मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाही. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत.
कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला ‘लेण्याद्री’ असे नांव पडले. हा भाग पुणे जिल्ह्य़ातील गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत. त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासाठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. या ठिकाणाचा उल्लेख ‘जीर्णापूर’ व ‘लेखन पर्वत’ असा झाल्याचे आढळते. असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या.
पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार ही अजिंठा-वेरूळ येथील नवव्या लेण्याशी मिळतीजुळती आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखडय़ावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे. सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणं आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे. ही गुहा अशाप्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते.
दर्शनाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ आहे. या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. ही पूजा अतिशय महत्वाची आहे.
इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या आठवड्यात मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह आयोजित केला जातो.