Saturday, August 30, 2025
Latest:
अध्यात्मिकखेडपंढरपूरपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रादेशिकमहाराष्ट्रयात्राविशेषसातारासोलापूरहवेली

बायो-बबल पध्दतीने वारीला परवानगी द्यावी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानची मागणी… ● माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट..

बायो-बबल पध्दतीने वारीला परवानगी द्यावी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानची मागणी…
● माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट..
● श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांसाह वारकऱ्यांचे भेटले शिष्टमंडळ
● आषाढी पायी वारीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन : देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

महाबुलेटीन न्यूज । किशोर कराळे
मुंबई : ‘बायो-बबल’ पद्धतीने निवडक वारकर्‍यांसह पंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी परवानगी द्यावी, या मागणीसाठी श्री. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी मंगळवार दि.8 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन दिले.

यावेळी संस्थान व वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने वारीचा कालावधी, वारकऱ्यांची संख्या, सहभागी वारकऱ्यांवर असणारे निर्बंधांसह वारीच्या मार्गावरील मुक्कामांच्या सर्व गावांचे ठराव असे अनेक व्यवहार्य प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांच्या कडे दिले.

श्री संत तुकाराम महाराजांच्या 336 व्या पालखी सोहळ्याचे 1 जुलै रोजी दुपारी 2 वाजता प्रस्थान होणार आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने परिस्थिती हळुहळु पुर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर 28 मे रोजी पुण्यात पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मानाच्या सात पालख्यांचे प्रमुख विश्वस्त व इतर मान्यवर उपस्थित होते. याबैठकीत मोजक्या 500 वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदाच्या पायीवारी पालखी सोहळ्यास परवानगी ही एकमताने मागणी केली होती. यामध्ये गावोगावी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होईल या बाबत चिंता व्यक्त करीत कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते.

मात्र पालखी सोहळा हा मराठी अध्यात्म संस्कृतीचा कळस व उपासणा विधीचा प्राण आहे, असे म्हणत या पायी वारीला जैव सुरक्षा (बायो-बबल) कवचामध्ये नेण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी शासनाची नियमावली मान्य करण्यात येईल, अशी मागणी उपस्थितांनी केली. या उपरही जर गर्दीचा प्रश्न निर्माण होत असेल तर आम्ही पायीवारी पालखी सोहळा बंदिस्त वाहनात व रात्री प्रवास करून नेऊ. वेळप्रसंगी मुक्कामाची ठिकाणेही कमी करू मात्र शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी संस्थानच्या वतीने केली असल्याची माहिती अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली. या बाबत विरोधी पक्ष नेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून बायोबबलचे नियम पाळले जातील या बाबत संस्थान व वारकऱ्यांच्या वतीने आश्वासन देतानाच शेकडो वर्षांची परंपरा असलेला पायी पालखी सोहला खंडीत करू नये यासाठी हे निवेदन दिले आहे.

यावेळी विठ्ठल रूख्मिणी मंदिरे समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर, श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यासंदर्भात देवेन्द्र फडणवीस यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन, असे आश्वासन दिल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास मोरे यांनी दिली.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!