आर्टिकल : लाल गव्हाचे मोदकाची गोष्ट
गणपती बाप्पा, लाल गहू आणि हरीत क्रांती
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : विशेष प्रतिनिधी
गणपती बाप्पा आले की प्रल्हाद शिंदे ह्यांनी गायलेले एक गीत हमखास ऐकू येते, ते म्हणजे….
“तूच सुखकर्ता, तूच दुख:हर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा”
“बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीतो माथा”
प्रल्हाद शिंदे हे एक प्रसिद्ध लोकगायक होते. आजचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे ( मोरया मोरया फेम ) ह्याचे आजोबा. साधारण 1965-66 च्या आसपास हे गीत लिहिले आणि गाईले गेले असेल असे मला वाटते ( माझ्या जन्माच्या 6-7 वर्षे आधी ) अजूनही ते तितकेच प्रसिद्ध आहे. ह्या गाण्याच्या काही ओळी नेहेमीच माझे लक्ष वेधून घेत असत.
त्या खालील प्रमाणे कवी गणपती बाप्पाला म्हणतो….
—————————-
नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे,
हाल ओळख साऱ्या घरांचे, कधी दिवस येतील सुखांचे?
सेवा जाणुनी, गोड मानूनी, द्यावा आशिर्वाद आम्हा,
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीतो माथा.
हे लाल गव्हाचे मोदक ही काय भानगड आहे ? हा मला नेहेमी प्रश्न पडायचा. ह्या वेळी ह्या प्रश्नाची उकल करायचीच असे मी ठरविले. झाले मग थोडा निवांत वेळ मिळताच
प्रथम वंदू श्री गणरायनंतर वंदू गुगल माय —— ईति मी स्वतःच
असा माझा नेहमीचा परिपाठ. गुगल माय ( इथे माय म्हणजे ज्ञान देणारी माता ) नेहमी सारखीच दयाळूपणे पाठीशी उभी राहिली.
तर मंडळी, ही लाल गव्हाची कथा आहे लाल बहादुर शास्त्रींच्या द्रुढ निर्धाराची, आपल्या शूर वीर जवानांची, डॉ. दिलबाग सिंग अटवाल ह्यांच्या हुशारीची, आपल्या अथक परिश्रम करणार्या शेतकरी बांधवांची आहे.1960 पासून भारतात अन्न धान्याचा तुटवडा जाणवतच होता. देशाच्या एकुण शेतजमीनी पैकी फक्त 10% जमिनीवर सिंचनाच्या सोयी उपलब्ध होत्या.1962 च्या चीनच्या युद्धानंतर आपला देश आर्थिक संकटातून जात होता. गव्हाचा प्रचंड तुटवडा जाणवायचा, तो भरून काढण्यासाठी मेक्सिको व अमेरिकेतून गहू आयात केला जायचा. हा येणारा गहू रेशनवर सर्वांना मिळायचा. हा गहू लाल रंगाचा असायचा. त्याचे पीठ लाल रंगाचे असायचे. त्यामुळेच त्याच्या केलेल्या पोळ्याही लालच असायच्या. तसेच गणपती बाप्पाला केलेले मोदकही असतील म्हणूनच वरील गीताचे कवी हरेंद्र जाधव घरातल्या गरीबीचे वर्णन करताना बाप्पा ला सांगतात. तांदूळ मोदकासाठी तर परवडतच नाहीत म्हणून नाव काढू नको तांदळाचे. गहू सुद्धा रेशनवर ( सरकारी स्वस्त धान्याचे दुकान ) आलेल्या लाल गव्हाचे आहेत केले मोदक लाल गव्हाचे तर देवा हे लाल गव्हाचे मोदक तुला गोड मानून घ्यावे लागतील.
1965 आला तो नेहमी सारखाच मान्सूनच्या लहरी वागण्याचा फटका घेऊन. पावसाच्या अभावाने अन्न धान्याचा प्रचंड तुटवडा आला. तेंव्हाच पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. आपले आदरणीय तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रीजी ह्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारतीय शूर जवानांनी पाकी सैन्याला मागे पिटाळत पिटाळत लाहोर पर्यंत कब्जा केला होता. रडक्या पाकिस्तानची बाजू घेत अमेरिका समोर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन ह्यांनी शास्त्रीजींना धमकी दिली की, तुम्ही युद्ध थांबवा अन्यथा आम्ही तुमचे गहू बंद करु, तुम्ही भुके मराल ( आंतरराष्ट्रीय राजकारणाची गंमत बघा, इतका टोकाचा भारत द्वेष करणारी अमेरिका आज त्यांच्या सोयीसाठी चीन विरुद्ध लढायला भारताला मदत करायला तयार आहे. अर्थात अमेरिकन राजकारण हे अत्यंत आत्मकेंद्रीत असते. त्यामुळेच कमला हैरिस ह्यांना उमेदवारी दिल्यामुळे ज्यो बायडेन ह्यांना डोक्यावर घ्यायचे किंवा मोदीजींची गळाभेट घेतल्यामुळे ट्रंप ह्यांचे गुणगान करायचे काहीच कारण नाही. त्यांचा स्वार्थ संपला की, ते सगळेच भारताविरुद्ध गरळ ओकणारच आहेत. )
शास्त्रीजी म्हणाले ,आम्हाला आमचे संरक्षण करण्याचा हक्क आहे. तुम्ही खुशाल आमचा गहू बंद करु शकता. ते एव्हढयावरच थांबले नाहीत, तर अमेरिकेतून गहू मागवायचेही बंद केले. आपल्या आत्मसन्मानासाठी त्यांनी भारतीयांना आवाहन केले.
हे सर्व चालू असतानाच भारतातील कृषितज्ञ डॉ. दिलबाग सिंग अटवाल ह्यांनी अथक परिश्रम करुन आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर संकरित वाणाचा ( Hybridization ) चा प्रयोग करुन हा लाल गहू सोनेरी बनवला. आपल्या गावाचे ( कल्याणपुर ) नाव त्याला दिले कल्याण. दिल्ली येथील केंद्रीय संस्थेतील शास्त्रज्ञांनी सोना नावाची गव्हाची जात विकसित केली. ह्या दोन्ही गव्हांच्या संकरातून ‘कल्याण सोना’ नावाची सोनेरी रंगाची गव्हाची निर्मिती झाली. भारतीय शेतकऱ्यांची मेहनत व डॉ. दिलबाग सिंग ह्या सारख्या शास्त्रज्ञांच्या बुद्धी कौशल्याने भारतात हरीत क्रांती झाली. आपला देश अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच, याउपर आपण जगाला अन्नधान्य पुरवू लागलो. ‘जय जवान, जय किसान‘ ही लालबहाद्दूर शास्त्री ह्यांनी 1965 मध्ये दसऱ्याला दिलेली घोषणा प्रत्यक्षात आणून भारतीय सैनिक व शेतकऱ्यांनी देशाची मान गौरवाने उंचावली. अशी ही लाल गव्हाच्या मोदकाची गोष्ट सोनेरी मोदकांवर आली.
गणपती बाप्पांनी तेंव्हा जसे भारतीयांच्या पाठी आशिर्वाद दिले तसे आत्ताच्या कठीण प्रसंगातही राहोत. त्याकाळी जशी सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती तंग झाली होती तशीच आजही दिसते आहे. गाण्याच्या पुढच्या कडव्यात ती परिस्थिती आणी सुखद भविष्यासाठी केलेली प्रार्थना आज ही किती लागू पडते पहा.
कवी हरेंद्र जाधव पुढच्या कडव्यात म्हणतात.
————————-
पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ,
गुळ-फुटाणे-खोबर नि केळ,साऱ्या प्रसादाची केली भेळ,
कर भक्षण आणि रक्षण, तुच पिता आणि तूच माता,
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीतो माथा.
लाल गव्हाचा शोध घेता घेता मला उलगडलेली ही गोष्ट बाप्पांच्या चरणी सादर करुन आपणा सर्वांवर आलेले विघ्न गणरायाने दूर करावे ही प्रार्थना.
–– डॉ. संतोष म. लाटकर
कान-नाक-घसा तज्ञ
पिंपरी-पुणे
sanoshlatkar@gmail.com
———————————-
# तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
# गायक : प्रल्हाद शिंदे
# गीतकार:हरेंद्र जाधव
# संगीत: मधुकर पाठक
—————————–