आर्टिकल : “आम्ही आहोत ना”…….
“आम्ही आहोत ना”
आपला संस्कार आहे, एखाद्याच्याआनंदाच्या क्षणी बोलावल्याशिवाय जायचं नाही, पण दुःखात बोलावण्याची वाट पहायची नाही ….
हाच संस्कार एका प्रसंगात तालुक्याभरात दिसून आला आणि अभिमान वाटला मी याच शिक्षक परिवाराचा एक भाग असल्याचा…
आपल्या बी.आर.सी.चे डेटा एन्ट्री ऑपरेटर श्री. शाम कांबळे आणि सौ. कांबळे वहिनी यांची अवघ्या १० वर्षाची लाडकी लेक सेजल (चिनू) हिला मेंदूचा कर्करोग असल्याची घटना अचानक समोर आली. सहज खेळता खेळता ती पडली डोक्याला जखम झाली आणि कर्करोगाचे निदान झाले ..
सगळेच अकस्मात आणि अकल्पित घडले. कांबळे कुटुंब तर पुरते कोसळून गेले. तिची आई तर अक्षरशः ढसाढसा रडत होती …
शेवटी डॉक्टरांच्या सल्याने ऑपरेशन झाले, पण उपचार आणखी काही महिने चालणार आहे …..
खर्च मोठा आहे एकीकडे पोरीच्या दुःखाच्या वेदना आणि दुसरीकडे आर्थिक संकट…
या संकटात धावून आले माझे खेड तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी…काही शिक्षक मित्रांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला आणि काही लाखांची रक्कम उभी राहिली. हा आहे माझ्या खेड तालुक्यातील शिक्षकाचा संस्कार ….
आपली मदत कदाचित काडीची असेल पण माझ्यावर प्रेम करणारी, संकटात हात देणारी माणसं इथे आहेत, ही भावना या कुटुंबासाठी लाख मोलाची आहे. मदतीचा ओघ अजून सुरूच आहे. ज्यांनी मदत केली आणि जे आणखी करणार आहेत त्या सगळ्या बंधु-भगिनींचे हार्दिक आभार..
आणि सलाम तुमच्या सहवेदनेच्या भावनेला……
वाईट इतकेच की, त्या निरागस लेकराला कॅन्सर कशाला म्हणतात याची जाणीवही नाही. ती रोज सकाळी हट्ट धरून बसते “पप्पा चला ना…, आपल्याला दवाखान्यात जायचंय…, डॉक्टर काका आपली वाट पाहत असतील” …..
रवी साकोरे ( पत्रकार, आदर्श शिक्षक )
