आर्टिकल : सर्कस
सर्कस चालवणं बनले तारेवरची कसरत
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : जे. डी. पराडकर
स्वत:च्या तोंडाला रंग फासून आणि जीवावर उदार होत प्रेक्षकांची करमणूक करणारे सर्कसचे कलाकार आणि त्यांचे जीवन म्हणजे एक कठोर निश्चयाचा खडतर जीवनप्रवासाच असतो. आयुष्यभर रसिकप्रेक्षकांची करमणूक करून त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलविणार्या सर्कसमधील कलाकारांच्या जीवनातील आनंद मात्र हरवून जातो. सर्कसचा हा डोलारा सांभाळणं म्हणजे ‘सर्कस चालवणं बनले तारेवरची कसरत’ अशी स्थिती या मालकांची होऊन बसली आहे.
लहान मुलांस रसिक प्रेक्षकांचा सर्वाधिक ओढा हा जादूचे प्रयोग आणि सर्कस पाहण्याकडेच अधिक असतो. एकेकाळी या दोन्ही प्रयोग माध्यमांना कमालीचं महत्त्व होतं. मात्र सर्कसमधील प्राण्यांच्या कसरती आणि प्रयोगांना कायद्याने बंदी आली तेव्हापासून सर्कशीचं महत्त्वच जणू संपुष्टात आलं. प्रेक्षकांचा सर्कस पाहण्याचा मूळ हेतू प्राण्यांचे दर्शन आणि त्यांच्या विविध हालचाली हा असल्याने देशातील सर्कशींचे प्रयोगच धोक्यात आले. प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने सर्कशीचा एवढा मोठा डोलारा चालवायचा कसा यासह वर्षानुवर्षे सर्कसमध्ये काम करणार्या कलाकारांचं पुढं करायचं काय, असे प्रश्न आजही अनुत्तरीतच राहिले आहेत. बहुतांशी सर्कशी बंद पडल्या आणि मालक कर्जबाजारी झाले, कलाकार बेकार होऊन वणवण करू लागले.
चित्रपटसृष्टीलाही सर्कसच्या खेळांचं मोठं वेड होतं. अनेक चित्रपटांमधून सर्कसमधील काही प्रसंग दाखवले गेले आहेत. राज कपूर यांनी तर ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट संपूर्ण सर्कसवर तयार करून जोकरसह सर्कसमधील कलाकारांच्या जीवनाची खरी ओळख प्रेक्षकांना करून दिली. या चित्रपटाने जोकरसह सर्कसच्या सर्व कलाकारांना अनोखा सन्मान मिळवून दिला. ‘मेरा नाम जोकर’मुळे सर्कसकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोनच बदलला. मात्र यानंतर काही वर्षांनी सर्कसमधील प्राण्यांच्या कसरतींवर बंद आली आणि सर्कस हा मनोरंजनाचा प्रकारच धोक्यात आला. देश-विदेशातील कलाकार घेऊन, जीव धोक्यात घालत कसरतीचे प्रयोग दाखवायचे तर प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांची उपस्थिती चांगली लाभली पाहिजे. २० ते २५ ट्रक भरून साहित्य, शेकडो कलाकार, शहरी परवानग्या मिळवणं, वाहतूक खर्च, जाहिरात, कलाकारांचं मानधन या सर्वांचं गणित जमविणे म्हणजे केवळ अशक्य झाले असून सर्कसचे मालक यामध्ये अक्षरश: कर्जबाजारी होत आहेत. मात्र गेली अनेक वर्षे या प्रयोगांसाठी साथ देणार्या कलाकारांना वार्यावर कसं सोडायचं, या एकमेव काळजीनं सध्या काही सर्कसचे प्रयोग सुरू आहेत.
सर्कसचे तिकीट, दिवसाचा खर्च मोठा असल्याने कमी ठेवणं परवडत नाही आणि अन्य ठिकाणी सहज दोनशे रुपये खर्च करणारी मंडळी सर्कसचा प्रयोग पाहण्यासाठी एवढा खर्च करायची मानसिकता ठेवत नाहीत. अशा स्थितीत मोठ्या कुटुंबाला दोनशे रुपयांची तिकीट काढून सर्कस पाहणे, सध्याच्या महागाईत परवडण्यासारखे नाही. शहरात विविध विभागांना फ्री पास द्यावे लागत असल्याने सर्कसचे आर्थिक गणित जमवणं केवळ अशक्य बनलं आहे. सध्या सुरू असणार्या काही मोजक्या सर्कसही नजीकच्या काळात बंद होऊन सर्कस हा थरारक आणि मनोरंजनाचा प्रकार दृष्टीआड होणार हे वास्तव आहे.
——-