Sunday, August 31, 2025
Latest:
कोरोनापुणे जिल्हामावळविशेष

आरोग्य सर्वेक्षणासाठी शिक्षकांना वेठीस धरू नका : गणेश भेगडे

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे :’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही आरोग्यविषयक योजना राबविताना त्यात राजकारण घुसता कामा नये. सर्व पक्षीय कार्यकर्ते, विविध संघटना, सेवाभावी संस्था, सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह स्वयंसेवी संस्थांना विश्वासात घेऊन काम करावे. शिक्षकांविरोधात आकस नको. आरोग्य सर्वेक्षणासाठी खासगी संस्थांच्या इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांना वेठीस धरू नका, असे आवाहन मावळ तालुका इंग्लिश मिडीयम स्कुल असोसिएशनचे कार्याध्यक्ष गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार प्रकाश ओसवाल, सहसचिव संदीप काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, गनिमियाँ सिकिलकर, किशोर राजस आदी उपस्थित होते.

गणेश भेगडे म्हणाले, प्रशासनाच्या नियोजनशून्य
कारभारामुळे पहिल्या टप्प्यातील तळेगाव शहरातील
महासर्वेक्षण अभियानाचा बोजवारा उडाला. या योजनेकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. फक्त कागदी घोडे नाचविण्याचे काम झाले. एक वैद्यकीय कर्मचारी आणि दोन स्वयंसेवक यांच्या माध्यमातून ५० घरांचे सर्वेक्षण करण्याचा शासकीय आदेश असताना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांना वेठीस धरण्यात आले. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची पूर्ण तयारी झाली होती. मात्र यासंदर्भात असोसिएशनचे सल्लागार माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्याशी संपर्क साधला. यामध्ये संस्थाचालक आणि शिक्षकांचा काहीच दोष नसल्याचे भेगडे यांनी शिर्के यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे शिक्षकांवरील गुन्हे दाखल झाले नाहीत. याच संदर्भात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांविषयी आमदार सुनील शेळके यांची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप गणेश भेगडे यांनी केला आहे.

शिक्षकांनी महासर्वेक्षण अभियानात सहभागी होऊ नये, असे संस्था चालकांनी कोठेही म्हटलेले नाही. या संदर्भात करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे चंद्रकांत शेटे आणि संतोष खांडगे यांनी सांगितले.

संतोष खांडगे म्हणाले, आमदार सुनील शेळके यांनी शासनाच्या १ मे २०२० रोजीच्या शुल्कवाढ हा अर्धवट जीआर चा फोटो काढून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रकाशित केला. त्यामुळे फी भरू नये याबाबत पालकांची दिशाभूल झाली. त्यामुळे पालकांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० ची बाकी फी व नवीन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची फी भरण्यासाठी असमर्थता दाखविली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा आर्थिक अडचणीत आहेत. सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्यावरच कामावर हजर होऊ, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. त्यामुळे जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले असल्याचे संतोष खांडगे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींचे ऐकून प्रशासकीय अधिकारी त्रास देतात, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्याय मागितला असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. प्रास्ताविक संतोष खांडगे यांनी केले. आभार संदीप काकडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!