अण्णाभाऊंचे साहित्य क्रांतीची प्रेरणा देणारे : माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : क्रांतीची प्रेरणा देणा-या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून ग्रामीण व कष्टक-यांच्या जीवनाचे खरे दर्शन घडते, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे
यांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भिमाई आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
मखरे म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी देश स्वातंत्र्यांचा लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, सामाजिक विषमते विरूद्धची लढाई अशा अनेक संघर्षात आघाडीच्या योध्दयाची भूमिका समर्थपणे बजावली. ते एक शाहीर म्हणून परिचित असले तरी त्यांनी साहित्यातील सर्व प्रकार सिध्दहस्तपणे हाताळले. पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या दुस-या दिवशी शिवाजीपार्कवर हजारोंचा मोर्चा आणून पडत्या पावसात ‘ये आझादी झुटी है, देश की जनता भूकी है’ असा नारा देणा-या अण्णाभाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा परिवर्तनाचा विचार स्वीकारला होता.”
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, संचालक राहुल सवणे, संचालिका शकुंतला मखरे व संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.