आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात १७ हजार फळझाडे रोपांचे वाटप
महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : शाश्वत संस्था मंचर व मर्सिडीज बेंझ चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव तालुक्यातील ४५ आदिवासी गावातील ११७९ शेतकरी लाभार्थ्यांना घोडेगाव येथील सुशांत नर्सरीतून १४, १५,१६ प्रमाणे सुमारे १७ हजार फळझाडे रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये कलमी आंबा, काजू, फणस, सीताफळ व आवळा या प्रकारच्या रोपांचा त्यामध्ये समावेश होता.
या कार्यक्रमाप्रसंगी शाश्वत संस्थेचे कोषाध्यक्ष, विश्वस्त अशोक आढाव, प्रकल्प प्रमुख शांताराम गुंजाळ, सुदाम चपटे, देवराम असवले, धर्मा असवले, संजीव असवले, शंकर लांघी, कृष्णा वडेकर आदी कार्यकर्ते व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.
आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी संस्थेकडे फळझाडे रोपांची मागणी केली होती, त्यानुसार शाश्वत संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश राजवाडे, विश्वस्त अशोक आढाव, विश्वस्त सुश्री प्रतिभाताई तांबे, सुश्री सुलोचना गवारी यांनी या प्रकल्पासाठी मर्सिडीज बेंझ यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावास कंपनीचे सीएसआरचे प्रमुख मंदार कुलकर्णी व स्वस्तिश्री मॅडम यांनी मंजुरी देऊन अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना तीन चार वर्षात या फळझाडांची फळे खावयास मिळतील. त्यामुळे त्याचे पोषण मूल्ये वाढेल व जंगल वाढीस मदत होऊन संस्थेचा उद्देश सफल होईल, असे मत यावेळी उपाध्यक्ष सुरेश राजवाडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सूत्रसंचालन सुदाम चपटे यांनी केले तर देवराम असवले यांनी आभार मानले.