आळंदीत श्रीकृष्ण जन्माष्टमी अंतर्गत जन्मोत्सव हरीनाम गजरात भक्तीमय साजरा
आळंदीत श्रीकृष्ण जन्माष्टमी अंतर्गत जन्मोत्सव हरीनाम गजरात भक्तीमय साजरा

महाबुलेटीन न्यूज / अर्जुन मेदनकर
आळंदी : भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्मोसत्व सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर बंद असुनही मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत यंदा प्रथमच साधेपणाने पण भक्तीमय वातावरणात गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रथापरंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात हा सोहळा साजरा करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. श्रींच्या जयंती दिनी पहाटे घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक पूजा, दुधारती, ब्रह्मवृंदाचा वेदमंत्र जयघोषात अभिषेक करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव कीर्तन सेवेचे मानकरी संतोष मोझे यांचे वतीने हभप. गजानन महाराज लहुडकर यांचे हृदयस्पर्शी वाणीतून कीर्तन सेवा आणि विना मंडपात गावकरी भजन दरम्यान एकाच वेळी झाले. आळंदी देवस्थानच्या वतीने श्रींची गोकुळ पूजा, त्यानंतर वंशपरंपरेने मानकरी मोझे महाराज यांचे वतीने हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात हरिनाम गजरात झाले.
श्रींचे जन्मोत्सव प्रसंगी पुष्पवृष्टी, आरती, सुंठवडा प्रसाद, उपवासाची खिरापत, मानकरी, सेवक यांना आळंदी देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद वाटप प्रथा परंपरेने करण्यात आला. यावेळी प्रमुख विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, श्री चे मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, योगेश आरू, राहुल चिताळकर, व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक उपस्थित होते.
——-