आळंदी पद्मावती रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा : भोसले पाटील
महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातील भैरवनाथ चौक ते पद्मावतीदेवी मंदिर १५ मीटर रुंदीकरणाचा रस्ता यासह आळंदी वारकरी शिक्षण संस्था ते पद्मावती रस्ता जोडणार्या अंतर्गत १२ मीटर रुंदीकरणाच्या रस्त्याचे काम आणि आळंदीतील जगन्नाथ पार्क मधील अंतर्गत रस्ते विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला असून या रस्त्यांची विकास कामे लवकरच सुरू होणार असलाची माहिती माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आळंदी येथील विविध विकास कामांचा पाठपुरावा व प्रलंबित विकास कामे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत भोसले पाटील बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रकाश कु-हाडे, माजी नगरसेवक आनंदा मुंगसे, गोविंद महाराज गोरे, आळंदी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख उत्तम गोगावले, काळुराम शिवले आदी उपस्थित होते.
आळंदी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर होवून अनेक वर्ष झाली तरी अनेक मंजूर कामे निधी जिल्हा स्तरावर शिल्लक असताना देखील कामे प्रलंबित राहिली आहेत. या प्रलंबित विविध विकास कामांचा पाठपुरावा राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे. यासाठी पालक मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन विधानसभा सभापती नाना पटोले, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त सौरभ राव, मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचेकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर या पाठपुराव्यास यश आले आहे.
आळंदीतील रस्ते उपलब्ध जागेचा विचार करून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया देखील झाली असून आळंदी भैरवनाथ चौक ते पद्मावती देवी मंदिर, वारकरी शिक्षण संस्था ते पद्मावती रस्ता, या लगत असलेला लोकवस्ती जगन्नाथ पार्क मधील अंतर्गत रस्ते विकासाचे कामांना सुरुवात होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व आळंदीतील पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केल्याचे माजी नगरसेवक भोसले पाटील यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक प्रकाश कु-हाडे म्हणाले, येथील शाळा क्रमांक ४ इमारत बांधकाम, खेळाचे मैदान विकास, बगीचा, व्यापारी संकुलचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होण्याची गरज असून प्रशासनाने यासाठी तात्काळ कार्यवाही करावी.
येथील फुटपाथ वरील अतिक्रमणे तसेच पुरनियंत्रण रेषेतील बांधकामे यावर प्रशासनाचा अंकुश राहिला नसून आळंदीच्या बकालपणात वाढत्या फ्लेक्सने अधिक वाढ झाली आहे.
—