Wednesday, April 16, 2025
Latest:
निवडणूकमुंबई

अजितदादांनी आमदार मोहितेंसह खेड मधील कार्यकर्त्यांची घेतली भेट, आढळरावांच्या उमेदवारीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा केला दूर

महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर :
शिरूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांना उमेदवारी दिली, तर घरी बसेन, असा टोकाचा विरोध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते- पाटील यांनी केला होता.

तो अजित पवार यांनी बुधवारी (ता. २०) मोहिते व त्यांच्या कार्यकर्त्यांची राजगुरुनगर (ता.खेड) येथे भेट घेऊन दूर केला अन् आढळरावांच्या उमेदवारीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला.

फुटीमुळे अडचणीत आलेल्या पक्षाचे आणि आपल्या नेत्याचे (अजितदादा) हित लक्षात घेऊन वीस वर्षांच्या टोकाच्या संघर्षाला विराम दिला, तडजोड केली, असे मोहितेंनी या भेटीनंतर सांगितले. आता आढळरावांच्या उमेदवारीमुळे शिरूरमधील लढत ही तुल्यबळ होईल, असे ते म्हणाले. आपल्या २५ वर्षांच्या राजकीय जीवनात अजितदादांनी प्रथमच आपल्या निवासस्थानी भेट दिल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. (Lok Sabha Election 2024 News)

अजितदादांनी नुकतीच (ता. १७ ) मुंबईतील आपल्या शासकीय बंगल्यावर शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या आमदारांची बैठक आढळरावांच्या उमेदवारीसाठी घेतली होती. त्यावेळी वीस वर्षांचे हाडवैर विसरून मोहितेंनी आपले सशर्त समर्थन आढळरावांना जाहीर केले होते. त्यासाठी अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याची अट त्यांनी टाकली होती. ती अजितदादांनी आज सकाळीच मोहितेंच्या निवासस्थानी जाऊन पूर्ण केली. तेथे त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. त्यांची समजूत काढली. त्यातून त्यांचा व मोहितेंचाही विरोध मावळला.

आढळरावांचे हाडवैरी असलेले राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी आपली भूमिका बदलल्याने मीसुद्धा पक्ष आणि कुटुंबप्रमुख अजितदादांसाठी त्यांनी आश्वासन दिल्याने तडजोड केली, माझ्या भूमिकेमुळे पक्ष, अजितदादा अडचणीत येणार असल्याने ती बाजूला ठेवली, असे मोहिते म्हणाले. दादांनी माझ्यासह कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेतल्याने आता मी तटस्थ राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आढळराव हे राष्ट्रवादीत येऊन उमेदवार असतील, असे ते म्हणाले.

मोहितेंना अजितदादांनी लावले मंत्रिपदाच्या मधाचे बोट

२००४ च्या लोकसभेला आढळरावांना अजितदादांनी तिकीट नाकारल्याने ते शिवसेनेत गेले होते. आता तेच आढळरावांना पुन्हा लोकसभेचीच उमेदवारी देत असल्याने ते पुन्हा घरवापसी करीत आहेत. दरम्यान, मोहितेंचा आढळरावांना असलेला विरोध दूर केल्यानंतर तेथेच अजितदादांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिरूर लोकसभेचा उमेदवार जाहीर केला. तसेच मोहिते मंत्री होतील, तेव्हा मी मुख्यमंत्री होईल, असे सांगत मोहितेंचे मंत्रिपदाचे स्वप्न साकार करण्याचे आश्वासन दिले. या वेळी वळसे-पाटीलही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!