आदर्श शिक्षिकेचा मुलासह कोरोनामुळे करूण अंत… ● एका आठवड्यात मुलगा व आईचे निधन…
● खराबवाडी शाळेत प्रदीर्घ काळ सेवा बजावलेल्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. महादेवी उमर्जे यांचे मुलगा सिद्धेश सह अल्पशा आजाराने निधन
● आमच्या बाई गेल्या, माजी विद्यार्थ्यांवर शोककळा
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) शाळेत प्रदीर्घ काळ सेवा बजावलेल्या ज्येष्ठ शिक्षिका व माळवाडी ( ता. मावळ ) शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका सौ. महादेवी उमर्जे ( रा. इंदोरी, पुणे, मूळ रा. सोलापूर ) यांचे मुलगा सिध्देशसह अल्पशा आजाराने निधन झाले.
जि.प. प्राथमिक शाळा कान्हेवाडी येथे सुरुवातीचे ५ वर्ष काम करुन जि.प.प्राथ.शाळा खराबवाडी येथे १८ वर्ष उपशिक्षक या पदावर काम करुन त्यानंतर मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा वडेश्वर व त्यानंतर माळवाडी येथे सेवानिवृत्त झालेल्या सौ. उमर्जे मँडम यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्याआधी त्यांचा मुलगा सिध्देश उमर्जे याचे एक आठवडयापूर्वी निधन झाले आहे.
अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, हजरजबाबी, अध्यापनकुशल, प्रशासकीय कामात हातखंडा, शिस्तप्रिय पण तितकयाच मायाळू , कणखर व धडाडी वृत्तीच्या बाईंनी असे अकाली जाणे चटका लावून गेले. मृत्यू समयी त्यांचे वय ६३ वर्ष होते.
खराबवाडी शाळेत त्यांनी अनेक विदयार्थी घडवले. आज ते विदयार्थी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्यरत आहेत. बाईंचे अनेक विदयार्थी विविध ठिकाणी उच्च पदावर काम करीत आहेत.
पुणे जिल्हा व खेड तालुक्यातील सर्वात मोठी पटसंख्या व शिक्षकसंख्या असलेली शाळा असा नावलौकिक असलेली खराबवाडी शाळेचा काही वर्ष उमर्जे बाईंनी पदभार घेतला होता. निश्चितपणे अशा ठिकाणी काम करणे एक कसोटी असते, परंतु बाईंनी अत्यंत कुशलतेने सर्व जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या. ग्रामस्थांना बरोबर घेऊन संस्थेचा विकास साधला. शाळेतील सर्व शिक्षकांशी मिळून मिसळून वागणे, सर्व शिक्षक वर्ग एकसंध कसा राहील यादृष्टीने बाईंचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते.
उमर्जे बाईंची वर्ग तयार करण्याची विशिष्ट हातोटी होती.
नवीन शिक्षकांना तर त्या आईच्या मायेने आधार दयायच्या. प्रेरणा व पाठिंब्याच्या बळावर अनेक शिक्षक कार्यकुशल झाले.
खराबवाडी शाळेतील त्यांच्या समवयस्क मुख्याध्यापिका पिंगळे मँडम व उमर्जे मँडम यांच्यातील उत्तम समन्वय व सहकारी शिक्षकांचे सहकार्य यामुळे तालुक्यातील इतर शाळा व शिक्षकांसाठी खराबवाडी शाळा एक आदर्श उदाहरण होते.
सेवानिवृत्ती नंतर शांतपणे जीवन जगत असताना, इतकी वर्ष प्रामाणिक पणे सेवाकार्य केलेल्या व सर्व खराबवाडी करांसाठी, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक सहकाऱ्यांसाठी अखंड प्रेरणास्थान असलेल्या सेवामूर्ती, ऋषीतूल्य व्यकतिमत्वाची अशी अकाली एक्झिट होणं अत्यंत वेदनादायी व क्लेशदायी आहे. एकाच वेळी आई व मुलाच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने खराबवाडी, इंदोरी, माळवाडी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद देवो, हिच अंतकरणापासून प्रार्थना.. स्व. सौ. महादेवी उमर्जे मँडम व सिध्देश उमर्जे यांना भावपूर्ण श्रद्धांजली… 💐💐💐
०००००