आमदार मोहिते पाटील स्पष्टच आणि खरे बोलले!
शिवाजी आतकरी
हातात टमराळ आणि चॅनल पायलीचे पन्नास! महिनाभर पेपर वाचू नका आणि चॅनल पाहू नका, असे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीररीत्या सांगितले. परखड आणि स्पष्ट बोलण्यात माहीर असलेल्या मोहिते पाटलांनी खरेच सांगितले. यात त्यांचे चुकले काय? वस्तुनिष्ठ सांगून पत्रकारितेतील भूछत्रांवर कडक कोरडे ओढले...
आमदार दिलीप मोहिते पाटील हा राजकारणातील तसा रांगडा माणूस. स्पष्ट, कडक आणि बिनधास्त बोलणारा हा नेता. त्यांच्या स्पष्ट बोलण्याने आणि निग्रही भूमिकेने ते जसे अनेकदा वादात राहिले तसे बातमीतही राहिले. शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्याविषयी मत मांडताना आणि इतकेच काय विधानसभेच्या सभागृहात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्दही त्यांनी कडक शब्दांचे प्रहार केले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवरही आमदार दिलीप मोहिते यांनी स्पष्ट भूमिका घेत आढळराव पाटलांना माझा विरोध राहील. पक्षाने पक्षाची भूमिका घ्यावी. मला माझे मत आहे. ज्यांच्या विरोधात कायम संघर्ष केला त्यांना मदत करणे माझ्या स्वभावात नाही, अशा पद्धतीचे मत मांडले होते. यावरून शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बराच दिवस होता. यात शेवटी खुद्द अजित पवार यांना मध्यस्थी करावी लागली.
एकूणच काय की, ‘दिलीप मोहिते आणि स्पष्ट भूमिका’ हे कायमस्वरूपी समीकरण आहे. कडक आणि बिनधास्त भूमिका हा कायम राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिला. याच पार्श्वभूमीवर अलीकडच्या पत्रकारितेवर त्यांनी बोट ठेवले. ‘हातात टमराळ आणि चॅनेल पायलीचे पन्नास’ असा अलीकडचा प्रकार दिसतो असे दिलीप मोहिते पाटील नुकतेच म्हणाले. पत्रकारिता व्यवसाय लक्षात घेता त्यांची गरज असली तरी आगामी एक महिन्यात पेपर वाचू नका, चॅनेल पाहू नका असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
सकृतदर्शनी दिलीप मोहिते पाटील यांच्या वक्तव्यास मोठा अर्थ आहे. पत्रकारितेतील व्यक्तींनी याचा गैर अर्थ न घेता आत्मपरीक्षण करावे असाच याचा अर्थ आहे. अलीकडचे चॅनेल्स, सोशल मीडिया, पोर्टल याचे फुटलेले पेव आणि पत्रकारितेतील दांभिकता, उथळपणा त्याचप्रमाणे झालेली भाऊगर्दी येथे लक्षात घ्यायला हवी. बातमीतील बात, उच्छृंखलपणा यामुळे बातमीतील सौंदर्य आणि पत्रकारितेतील लय हरवलेली अलीकडे दिसते. पत्रकारितेतील एक प्रकारची अराजक परिस्थिती अलीकडे समोर आलेली आहे. तत्वनिष्ठ पत्रकारिता या सगळ्या गदारोळात बाजूला पडलेली आहे. हे ढळढळीत सत्य आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे दिलीप मोहिते पाटलांनी यावर जाहीररित्या भाष्य केले त्यात चुकीचे अजिबात नाही. वस्तुस्थिती त्यांनी मांडली. अलीकडच्या पत्रकारितेवर त्यांनी प्रत्यक्षरीत्या कोरडे ओढले. व्यासंगी पत्रकारांची गोष्ट वेगळी आहे परंतु इतरांनी आत्मपरीक्षण करावे असाच मोहिते पाटलांच्या बोलण्यातून अर्थ निघतो असे समजायला हरकत नाही.