आई-वडिलांविषयीच्या कृतज्ञता सोहळ्यातून घडतात भावी पिढीवर संस्कार : प्रकाश काळे ● वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आळंदीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
आई-वडिलांविषयीच्या कृतज्ञता सोहळ्यातून घडतात भावी पिढीवर संस्कार : प्रकाश काळे
वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आळंदीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : बदलत्या गतिमान जीवनशैलीत लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी आई-वडिलांविषयी कृतज्ञता सोहळे आवश्यक आहेत, असे विचार श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी व्यक्त केले.
आळंदी येथील बांधकाम व्यवसायीक, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजीनदार डॉ. दीपक पाटील यांनी आपल्या वडिलांच्या सातव्या पुण्यस्मरणा निमित्त समर्थ हॉस्पिटल आळंदी आणि नित्यसेवा हॉस्पिटल धानोरे यांना टाटा मॅजिक ही रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) लोकार्पण केली, याप्रसंगी ते बोलत होते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर महोत्सवानिमित्त महंत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या संकल्पनेनुसार ज्ञानेश्वरीच्या नवव्या व बाराव्या अध्यायाचे १०८ घरी जाऊन पारायण व किर्तन वर्षभरात होणार आहेत. यातील या सोहळ्यानिमित्त पारायण व कीर्तनाचे ४४ वे पुष्प डॉ. पाटील यांच्या घरी गुंफले.
या प्रसंगी आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगावकर, माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, भारत सैनिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप भोसले, ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे उपव्यवस्थापक श्रीधर सरनाईक, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, उद्योजक तुकाराम गवारी, प्राचार्य दीपक मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, कमांडो रघुनाथ सावंत, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच पाटील यांचे मित्रमंडळी, नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती कुसुमताई श्रीधर पाटील यांचा सत्कार कांताबाई वडगावकर यांच्या हस्ते गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आळंदीच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्व. श्रीधर एकनाथ पाटील गुरुजी, श्रीमती कुसुमताई श्रीधर पाटील यांचेसह त्यांच्या कुटुंबीयांच्या कार्याचा गौरव अजित वडगावकर, राजाभाऊ चोपदार, प्रकाश कुऱ्हाडे, डी.डी. भोसले पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
संगीता फिरके यांनी प्रास्ताविक केले. एस.जी. मुंगसे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दीपक पाटील यांनी आभार मानले.
००००