आपण काम करून उदघाटन करतोय, काही लोक दमडीचही काम न करता उदघाटन करतात! – आढळरावांचा खासदार डॉ. कोल्हे यांना टोला… ● डॉ. कोल्हे यांच्या अगोदर खेड घाटात आढळरावांची झाली फळीफोड
आपण काम करून उदघाटन करतोय, काही लोक दमडीचही काम न करता उदघाटन करतात! – आढळरावांचा डॉ. कोल्हे यांना टोला…
● कोल्हे यांच्या अगोदर खेड घाटात आढळरावांची झाली फळीफोड
महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आज ( दि. १६ जुलै ) खेड घाट व नारायणगाव बाह्यवळण मार्गाचे उदघाटन करून दोन्ही बाजूने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या दोन्ही ठिकाणच्या बाह्यवळणाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवार दि. १७ जुलै रोजी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते व आमदार दिलीप मोहिते पाटील व आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते. परंतु उदघाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने नितीन गडकरी व शरद पवार यांचे फोटो टाकून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा फोटो टाकला नाही, त्यामुळे महाआघाडीचा धर्म न पाळल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने आज फळीफोड करून या रस्त्याचे उदघाटन आदल्या दिवशीच उरकून घेतले, त्यामुळे दोन्ही पक्षातील श्रेयवादाची उत्तर पुणे जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली.
यावेळी आढळराव यांनी डॉ. कोल्हे यांच्यावर चौफेर टीका करून म्हणाले की, “खेड-सिन्नर प्रकल्पाला मंजूरी मिळवण्याबरोबरच या महामार्गावरील बाह्यवळणांची कामे मार्गी लावण्यासाठी मी गेली 5-6 वर्षे प्रचंड मेहनत घेतली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने या मेहनतीला यश येऊन येथील लोकांना रस्ते वाहतूक कोंडीतुन मुक्त करण्यासाठी दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे हे दोन्ही बायपास सुरू होताना मला अतिशय आनंद होत आहे.