Thursday, April 17, 2025
Latest:
अध्यात्मिकखेडपंढरपूरपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागमहाराष्ट्रमुंबईविशेषहवेली

देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी… ● आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर

देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी…

● आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
मुंबई, दि. १६ : यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने निमावलीत नमूद केले आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पैार्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा व विठ्ठल संतांच्या भेटीस गेल्यावर्षी प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. तर ‘श्रीं’चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल. तर संत भानुदास महाराज यांच्या पुण्यतिथीसाठी २+२ असे एकूण चार व्यक्तींच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्यास व श्री. विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक १-१५ व्यक्तीसह साध्या पद्धतीने साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ह.भ.प. श्री. गुरुदास महाराज देगलूरकरांचे चक्रीभवनसाठी ह.भ.प. देगलूकर महाराज व अन्य चार व्यक्ती असे एकूण पाच व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. ह.भ.प. श्री. अंमळनेरकर व ह.भ.प. कुकुरमुंडेकर महाराज यांचे सोबत प्रत्येकी दोन व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.

महाद्वार काला उत्सवासाठी व श्री.संत नामदेव महाराज समाधी सोहळा १+१० व्यक्तीसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशींच्या रथोत्सवासाठी रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने १० मानकरी व मंदिर समितीचे पाच कर्मचारी असे १५ व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वारकरी संख्येच्या निकषानुसार संतांच्या पादुका भेटीसाठी, मानाच्या पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी दोन बस व प्रत्येकी बसमध्ये २० प्रमाणे ४० संख्या निश्चित केली आहे. गोपाळकालासाठी मानाच्या पालखी सोहळयाला १+१० या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन व कीर्तनास परवानगी देण्यात आली आहे.

संताचे नैवेद्य व पादुकासाठी यावर्षी दशमी ते पैार्णिमा असे ६ दिवस २ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. श्री. विठ्ठलाची प्रक्षाळपूजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक २+३ श्री. रूक्मीणी मातेची प्रक्षाळपूजा २+३, श्री. विठ्ठलाकडे ११ पुजाऱ्यांकडून श्रीस रूद्राचा अभिषेक व श्री. रूक्म‍िणी मातेस ११ पुजाऱ्यांकडून पवनमान अभिषेक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आषाढी एकादशी दिवशी २० जुलै २०२१ रोजी स्थानिक महाराज अशा १९५ मंडळींना श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे मुखदर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत त्यांना वेळ व प्रवेशपत्रिका देण्याबाबतची कार्यवाही मंदिर समितीने करावयाची आहे.

यासोबतच गेल्यावर्षी मंदीर खुले करण्याबाबत जी स्थिती होती तीच कायम राहील. तसेच या सोहळ्यासाठी आयोजनाबाबत एखादी बाब राहून गेल्यास त्या बाबी संदर्भात मागील वर्षी जो निर्णय घेण्यात आला होता तोच निर्णय यंदाही घेण्यात यावा, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!