पुणे-नासिक राष्ट्रीय महामार्गाची व तळेगाव चौकातील नियोजित उड्डाणपुलाच्या जागेची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली पाहणी…
पुणे-नासिक राष्ट्रीय महामार्गाची व तळेगाव चौकातील नियोजित उड्डाणपुलाच्या जागेची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली पाहणी…
● पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मोशी ते चांडोली टप्प्यातील सहा पदरी रस्त्याचे काम सप्टेंबर पासून सुरू होणार..
● आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्याने झालेले नुकसान आगामी काळातील पुणे-नासिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग व चाकण पर्यंत येणाऱ्या मेट्रोमुळे नुकसान भरून निघेल : खासदार डॉ. अमोल कोल्हे
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मोशी ते चांडोली टप्प्यातील रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर चाकण येथील तळेगाव चौकातील नियोजित उड्डाणपुलाच्या जागेची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी ( दि. १२ जून ) पाहणी केली. चाकण येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्याने खेड तालुक्याचे झालेले नुकसान आगामी काळातील पुणे-नासिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग व चाकण पर्यंत येणाऱ्या मेट्रोमुळे नुकसान भरून निघेल, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
या पुलाचे काम करताना मेदनकरवाडी, नाणेकरवाडी येथील लोकवस्तीला दोन्ही दिशेने जाण्या-येण्यासाठी रस्त्यांची सुविधा देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन नागरिकांची वाहतूक सुरळीत होईल, अशा पद्धतीने बदल करण्याच्या सूचना दिल्या.
हा महामार्ग सहापदरी असून ६० मीटरचा आहे. या महामार्गाला क्रॉस होणारा तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा महामार्ग चार पदरी आहे. तळेगाव चौकातील उड्डाणपुलाची उंची सहा फुटाची असणार आहे. तळेगाव चौकात महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूला लूप असणार आहेत. त्यामुळे तळेगाव चौकातील अतिक्रमणे निघणार आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, शहराध्यक्ष राम गोरे, नगरसेवक प्रकाश भुजबळ, राहुल नायकवाडी, भगवान मेदनकर, मनोज खांडेभराड, उल्हास मेदनकर, मोबीनभाई काझी, तुकारामशेठ कांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, नाणेकरवाडीचे सरपंच संदेश साळवे, उपसरपंच रावसाहेब नाणेकर, ग्रा. प. सदस्य व माजी उपसरपंच वासुदेव नाणेकर, बाळासाहेब नाणेकर, कुशल जाधव, अतुल नाणेकर, मेदनकरवाडीचे माजी उपसरपंच महेंद्र मेदनकर, विजय खाडे, तपन कांडगे, विशाल नायकवाडी, दादा पवार आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
● दरम्यान चाकण येथील तळेगाव चौकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्याची व चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी श्री शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आली.
०००००