बहीण-भावाचं अतूट नातं…बहिणीच्या दशक्रियेच्या दिवशीच सख्ख्या भावाचा कोरोनाने मृत्यू… ● उच्च शिक्षित, तरुण बहीण-भावाच्या मृत्यूमुळे आंबेगाव तालुक्यावर शोककळा
बहीण-भावाचं अतूट नातं… बहिणीच्या दशक्रियेच्या दिवशीच सख्ख्या भावाचा कोरोनाने मृत्यू…
● उच्च शिक्षित, तरुण बहीण-भावाच्या मृत्यूमुळे आंबेगाव तालुक्यावर शोककळा
महाबुलेटीन न्यूज
मंचर ( पुणे ) : कोरोना महामारीच्या संकटात मनाला वेदना देणाऱ्या घटना दिवसेंदिवस घडत असताना बहिनीच्या निधनानंतर दशक्रिया विधीच्या दिवशीच भावाचाही कोरोनामुळे मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील बाळासाहेब हिंगे यांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव होऊन संपुर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली त्यात बाळासाहेब हिंगे व त्यांच्या पत्नी यांनी कोरोनावर यशस्वी मात केली; मात्र आई वडिलांनी कोरोनावर मात करत असताना लेकीचा मात्र मृत्यु झाला. त्यावेळी भावावर रुग्नालयात उपचार सुरु होते. याचदरम्यान बहिणीच्या दशक्रियेच्या दिवशीच भावाचाही मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
माधवी हिंगे पाटील हिचे डी.एड. पर्यंत शिक्षण झाले होते. तिने ज्योतिष शास्त्र, अंक शास्त्र विषयात पदवी घेतली होती. तर तिचा धाकटा भाऊ मयुर हा संगणक इंजिनिअर झाला होता. पंधरा दिवसांपूर्वी आई-वडील आणि भाऊ-बहीण एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
एकामागून एक कोरोनाने पोटची मुलं हिरावल्यामुळे हिंगे पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तर ते राहत असलेल्या परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माधवी आणि मयुर यांचे वडील शेती करत असून आई पंचायत समिती आंबेगाव येथे अंगणवाडी केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहे. उच्चशिक्षित दोन्ही बहिण-भाऊ तरुण वयातच कोरोनाचे बळी ठरल्याने उत्तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हळहळ व्यक्त होत आहे.
०००००