साहित्य परिषद ही मंडळीकरणाची आणि लोकशिक्षणाची सांस्कृतिक प्रयोगशाळा : डॉ. राजा दीक्षित ● मसापच्या ११५ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन
साहित्य परिषद ही मंडळीकरणाची आणि लोकशिक्षणाची सांस्कृतिक प्रयोगशाळा : डॉ. राजा दीक्षित
● मसापच्या ११५ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : साहित्य परिषदेच्या पारंब्या आज ग्रामीण-आदिवासी भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत, समाजाचे मंडळीकरण झाले पाहिजे असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणत असत. परिषदे सारख्या संस्था या एका अर्थी अशा मंडळीकरणाच्या आणि लोकशिक्षणाच्या सांस्कृतिक प्रयोगशाळा असतात. असे मत वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या नवभारत मासिकाचे संपादक आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.
सलग दुसऱ्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे परिषदेच्या ११५ व्या वर्धापनदिनाचा जाहीर कार्यक्रम होऊ शकला नाही. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रा. डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते संस्थेचे आद्य प्रेरक न्या. रानडे, लोकमान्य टिळक आणि न. चि. केळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ग्रंथपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर, माधव राजगुरू, वि. दा. पिंगळे आणि डॉ. सतीश देसाई उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, ‘आधुनिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपला महत्वपूर्ण ठसा उमटवलेला आहे. तिच्या स्थापनेच्या वेळी लोकमान्य टिळक म्हणाले होते की, केवळ उत्कट इच्छेने कामे होत नसतात, तर कर्ते पुरुष पुढे यावे लागतात. परिषदेचा इतिहास म्हणजे अशा कर्त्या स्त्री-पुरुषांच्या साहित्यविषयक समाजकार्याची कहाणी आहे. द. वा. पोतदार, नी. शं. नवरे आणि म. श्री. दीक्षित यांनी लिहिलेले परिषदेचे इतिहास याची साक्ष देतात.
कोरोनाने काळवंडलेल्या काळात महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या ११५ वर्षे काम करणाऱ्या संस्थेचा वर्धापनदिन जाहीरपणे साजरा करणे शक्य नाही, ही एक शोकांतिका आहे. पण सर्व जगच एका महाशोकांतिकेतून जात असताना अशा विविध शोकांतिकांना तोंड देतच आपल्याला निर्धाराने वाटचाल करायची आहे. म्हणून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या संख्येने आणि सुरक्षित अंतर पाळत वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन करणे या गोष्टीला एक प्रतिकात्मक मूल्य आहे.
हा छोटासा किरण म्हणजे एका भयानक तमोमयतेतून प्रकाशवाटांचे सूचन करणारा आशेचा किरण आहे, अनेक तामोयुगे पचवून मानवजात पुढे गेलेली आहे आणि साहित्य फुलत राहिलेले आहे, याचे भान आपण सतत ठेवले पाहिजे. साहित्यविश्व जेवढे सकस, सजग आणि बहुमुखी होईल, तेवढी आपली सामाजिक मानसिकता निकोप होऊ शकेल. म्हणूनच मी परिषदेच्या कार्याकडे आशेने पाहतो.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, कोरोना संकटाचे साहित्य क्षेत्रावरही दूरगामी परिणाम झाले आहेत. भविष्यात साहित्य संस्था, लेखक, प्रकाशक, संपादक, चित्रकार, मुद्रितशोधक, छपाई प्रक्रियेतील सर्व घटक, ग्रंथ वितरक, ग्रंथ विक्रेते आणि साहित्य रसिक यांनी परस्परांशी सतत संवाद साधून सामूहिक प्रयत्नातून येणाऱ्या आव्हानांचा सामना केला पाहिजे. जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत आजवर परिषदेची वाटचाल झाली आहे. यापुढेही होत राहील.” प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.
● मश्रींच्या आठवणींने गहिवरले राजा दीक्षित
—————————————–
मिलिटरी अकाउंट्समधील नोकरी सोडून साहित्य परिषदेवरील प्रेमापोटी ज्येष्ठ साहित्य सेवक म. श्री. दीक्षित परिषदेच्या कार्यालयात सेवक म्हणून रुजू झाले. ते ६७ वर्षे परिषदेशी संबंधित होते. माझा विवाह आर्थिक अडचणीमुळे मी नोंदणी पद्धतीने केला आणि जमवलेल्या रकमेतून मी आणि म. श्री. दीक्षित परिषदेचे आजीव सभासद एकाचवेळी झालो, अशी आठवण सांगताना डॉ. राजा दीक्षित गहिवरले.
०००००