आळंदीत वारकरी विद्यार्थ्याचे अनैसर्गिक लैंगिक शोषण… ● पोस्को कायद्या अंतर्गत एका महाराजवर गुन्हा व अटक
आळंदीत वारकरी विद्यार्थ्याचे अनैसर्गिक लैंगिक शोषण…
● पोस्को कायद्या अंतर्गत एका महाराजवर गुन्हा व अटक
महाबुलेटीन न्यूज
आळंदी : दोन महिन्यांपूर्वी वारकरी संप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अकरा वर्षाच्या वारकरी विद्यार्थ्याचे गुरूनेच अनैसर्गिकरित्या लैगिंक शोषण केल्याची घटना आळंदीत उघडकीस आली आहे. पोस्को कायद्याअंतर्गत शिवप्रसाद रामनाथ भोकनळ या आरोपीवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.
ही घटना तीन दिवसांपूर्वी आळंदीतील सिद्धबेट येथील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ आरोपी शिवप्रसाद भोकनळ चालवित असलेल्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या सामान ठेवायच्या खोलीत घडली. शुक्रवारी (ता.१४) दुपारी दोन ते तिन वाजण्याच्या दरम्यान संस्थेतील इतर विद्यार्थी हरिपाठ म्हणण्यासाठी सिद्धबेट येथे चालले होते. यावेळी पिडीत विद्यार्थीही त्यांच्यासोबत घराबाहेर चालला असता आरोपी भोकनळ याने पिडीत विद्यार्थ्यास तू इतर विद्यार्थ्यांबरोबर बाहेर जावू नकोस. मला तुझ्याकडे काम आहे, असे म्हणून संस्थेतच ठेवून घेतले. त्यानंतर या अवघ्या अकरा वर्षाच्या आपल्याच शिष्य विद्यार्थ्यावर आरोपीने अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर सदरची घटना आई वडिलांना पिडीत मुलाने सांगितली. आणि हा प्रकार उघडकीस आला.
नुकतेच मोलमजूरीसाठी हिंगोली जिल्ह्यातून आलेली कुटूंबिय आपल्या मुलाला संप्रदायिक शिक्षण मिळेल या आशेने आरोपीकडे शिक्षणासाठी ठेवले होते. मात्र या घटनेने तेही भयभित झाले. स्थानिक काही नागरिकांनी पिडीत मुलाच्या आई वडिलांना बळ दिल्याने आरोपी भोकनळचा कारनामा अखेर आळंदी पोलिस ठाण्यात गेला. आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलिस उपनिरिक्षक अजय लोहेकर, पोलिस उपनिरिक्षक सुरेखा सागर यांनी पिडीत विद्यार्थ्यास आणि आई वडिलांना विद्यार्थ्यास विश्वासात घेवून धिर दिला. त्यानंतर गुन्हा दाखल करून भोकनळ यांस अटक केली. दरम्यान संस्थेतील इतर विद्यार्थ्यांना मात्र आपापल्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
आपल्याच विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करण्याचा गेल्या पाच सात वर्षातील हा चौथा प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाऊन काळातही वारकरी विद्यार्थी बोलावून संस्था सुरू करण्याचा प्रकार काही महाराज मंडळींनी केवळ स्वतःच्या चरितार्थासाठी केला. तोकड्या संप्रदायिक ज्ञानावर लोकांच्या भक्तीचा फायदा घेवून संस्था तयार करून विद्यार्थी आळंदीत आणायचे आणि त्यानंतर असा प्रकार झाल्यावर इतरांनी दडपण्याचा प्रकार करायचा, असे उद्योग सध्या सुरू आहे. मात्र काही महाराज मंडळींनी अशा बोगस संस्था बंद करण्याची मागणी केली आहे. आळंदी पालिका आणि पोलिसांचे यावर नियंत्रण असावे, असाही सुर नागरिकांमधून येत आहे.
०००००