चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंदची सरपंचांची मागणी
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंदची सरपंचांची मागणी
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण MIDC : खेड तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या प्रचंड वाढत चालल्याने परिस्थिती गंभीर झाली असून जिल्हा आपत्ती प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला पाहिजे. ग्रामीण भागात वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याने अनेकांना जीव गमवावा लागतोय ही सत्यस्थिती आहे. एमआयडीसी क्षेत्रातील अनेक गावच्या सरपंचांनी कारखाने बंदची मागणी केली. म्हणून कोरोनाचे मूळ असलेल्या खेडच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कारखाने पूर्णतः बंद करण्याची गरज आहे. नाहीतर जिल्ह्यातील खेडच्या जनतेला याची मोठी किंमत मोजावी लागणार यात शंकाच नाही.
खेड तालुक्यातील एमआयडीसी जगाच्या नकाशावर आहे. येथील एमआयडीसी कारखान्यातील कामगार त्याच गावच्या परिसरात राहतात. कामगारांना कंपनीत कसल्याही सुविधा नाहीत व शासनाचे नियम देखील पाळत नाहीत. कंपनीच्या कामगारांमुळे प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला ही सत्यस्थिती आहे. कामगार देखील जीव धोक्यात घालून काम करताना दिसत आहेत.
अनेक कंपनीतील कामगार तर तोंडाला मास्क न वापरता व सामाजिक अंतर न राखता काम करताना दिसतात याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे कंपनीतील सत्यस्थिती पाहायला मिळत आहे. एमआयडीसी क्षेत्रातील अनेक गावच्या सरपंचासह या भागातील जिल्हा परीषद व पंचायत समितीचे सदस्य यांनी कंपन्या बंद करण्याची मागणी केली आहे. एमआयडीसी क्षेत्रात पुणे जिल्हा परिषदेने भरारी पथके नेमल्याची घोषणा मागील काही काळात जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी केली होती, परंतु त्यांची ही घोषणा फोल ठरली आहे. कंपनी प्रशासनावर शासनाचा कोणाचाही आणि कसलाही वचक नाही. त्यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरू कसाही सुरू आहे.
———————————————————
कंपन्याचे काम काही काळ बंद केले पाहिजे. कंपन्यांचे कामगारांमुळे गावातील नागरिकांचे हाल सुरू आहेत. कंपन्या बंद केल्यातर संसर्ग आटोक्यात येईल. कंपन्यांचे कामगार यामुळे गावचे नागरिक संक्रमित होत आहेत, ही सत्यस्थिती आहे.
-दिनेश किसन लांडगे , सरपंच वराळे
——————————————
“एमआयडीसीतील कंपन्या चालू असल्याने, एमआयडीसीतील गावात कोरोना संपर्क प्रचंड वाढला आहे, त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती भयाण होत चालली आहे. जर हे असेच चालू राहिले तर गावाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. यासाठी कठोर उपाय योजना म्हणून एकतर कामगारांची सोय कंपनीतच करणे गरजेचे आहे, आणि ते शक्य नसेल तर काही दिवसांसाठी संपूर्ण एमआयडीसी बंद ठेवायला हवी. तरच परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.”
-भरत शांताराम तरस , सरपंच सावरदरी
——————————————
गावाच्या परिसरात राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय अनेक कंपन्या आहेत.अनेक कंपन्यांचे कामगार गावात भाड्याने राहतात.गावातील कोरोनास्थिती हाताबाहेर गेली. कामगार कामावर आले नाहीतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल अशा सूचना कंपनी प्रशासनाच्या असल्याने नाईलाजास्तव कामगार कामाला जातात,परंतु काही दिवस कंपन्यांची कामे शासनाने बंद करावीत.
-भरत भिमाजी लांडगे , सरपंच भांबोली
————————————–
. कंपन्यांच्या कामगारांमुळे गावात कोरोनाचा संसर्ग वाढतोय ही भयानक परिस्थिती आहे.कामगार दररोज कामावर जातात व पुन्हा घरी येतात.कंपनी प्रशासनाने त्यांची कंपनीत सोय केली नाही.कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कंपन्या बंद केल्या पाहिजेत.
-संघमित्रा दत्तात्रय नाईकनवरे , सरपंच आंबेठाण
——————————————
एमआयडीसी परिसरातील गावात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत असुन ग्रामपंचायत माध्यमातून जनजागृती म्हणून फवारणी,मास, सेनिटाईझर,लसीकरण असे उपाय योजना करुन देखिल रुग्ण वाढत आहेत,याचे मुख्य कारण कंपन्या नियम पाळत नाहीत व गावात प्रसार होत आहे.म्हणुन कंपन्या काही काळ बंदची गरजच आहे.
-सचिन आनंदा देवकर, सरपंच शिंदेगाव
————————————–
एमआयडीसी क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती भयानक असून या भागातील नागरिकांना सुरक्षित ठेवायचे असेल तर कंपन्यांची कामे बंद ठेवणे हाच एकमेव उपाय आणि पर्याय आहे.कंपन्यांची कामे बंद केली नाहीतर शासनाने एमआयडीसी गावात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांना शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे.
-चांगदेव शिवेकर , उपसभापती पं.स.खेड
—————————————–
केवळ इंजेक्शन,ऑक्सिजन बेड आणि लसीकरण यावरच लक्ष केंद्रित करून होणार नाही.येत्या १५ दिवसात ग्रामीण भागातला संसर्ग थांबवला नाही तर खेड तालुक्यासह जिल्ह्याला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.आपत्ती व्यवस्थापणाचे प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतोय,परंतु काही बदल होताना दिसत नाही.ग्रामीण भागातले कार्यक्रम पूर्णतःबंद करून कारखाने पंधरा दिवस बंद ठेवले पाहिजेत.सगळीकडे मोठ्या पैशाची आवश्यकता नाही,परंतु इच्छाशक्तीची आवश्यकता आहे आणि आज तरी ही इच्छाशक्ती जिल्हा प्रशासनामध्ये मला पाहायला मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे.
-शरद आनंदराव बुट्टे पाटील , जि.प.सदस्य
————————————–
