Wednesday, April 16, 2025
Latest:
नागरी समस्यापुणे जिल्हामावळविशेष

पाणीपट्टी बिलांचा प्रश्न नगरपालिका प्रशासनाने मार्गी लावावा : किशोर आवारे

 

महाबुलेटीन न्यूज : मिलिंद अच्युत
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या पाणी पट्टी बिलालाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केली आहे. 

सन 2016-17 तसेच सन 2017-18 या काळात पाणी बिलांचे वाटपच झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. योग्य वेळेत पाणी बिले वाटलीच गेली नाहीत, त्यामुळे पाणी बिलांचा भरणा होऊ शकला नाही व न भरलेल्या पाणी बिलासाठी विलंब शुल्क व वार्षिक 24% दंडणीय व्याज आकारले जात असल्याने लवकरात लवकर पाणी पट्टी बिलांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे. तसेच योग्य वेळेत पाणी बिलांचे वाटप का झाले नाही? याचे स्पष्टीकरण नगर प्रशासनाने करावे, अशी मागणी आवारे यांनी केली.

सन 2016-17 व सन 2017-18 या आर्थिक वर्षातील पाणी पट्टी बिलांबाबत नगरपरिषद प्रशासन संभ्रमात राहिल्याने पाणी पट्टी देयके गृह निर्माण संस्थांना देण्यात आलेली नाहीत. या करिता सन 2018-19 पासून मा. विभागीय आयुक्त पुणे यांचे दिनांक 26-05-2016 चे आदेशानुसार पाणी पट्टी बिले ही मीटरच्या प्रत्यक्ष रीडिंग नुसार व दोन महिन्यांच्या सरासरी वापरा नुसार निर्माण झालेल्या पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात आली आहेत. नगर परिषदेने मागणी बिल दिल्या नंतर 90 दिवसात रक्कम भरणे आवश्यक आहे, अशी रकम न भरल्यास त्यास प्रति महिना 2% प्रमाणे दंडनीय व्याज महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 कलम 150 अ नुसार आकारले जाते. सदर दंडनीय व्याज हे जाचक स्वरूपाचे असून, नगर प्रशासनाने व्याजाचा सखोल विचार करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच पाणी बिलांचे वाटप योग्य वेळेत का झाले नाही? याचा खुलासा प्रशासनाने करावा, असे मत किशोर आवारे यांनी व्यक्त केले.

पाणी बिलांबाबतचा निर्णय नगर प्रशासनाकडे प्राप्त झाला असून त्याची अंमलबजावणी करणे बाकी आहे. जर पाणी बिलांवरील व्याज माफ झाले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांकडून व्याजाची वसुली व्हावी, सामान्य नागरिकांना भुर्दंड नको, अशी मागणी आवारे यांनी यावेळी केली. कोरोना काळातील लॉक डाउनमुळे आर्थिक अडचणी सापडलेल्या नागरिकांना 2% मासिक अतिरिक्त पाणी पट्टीवर व्याज लावण्यात आल्यामुळे नगर प्रशासना बद्दल असंतोषाची लाट नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

नागरिक मंच, तळेगाव दाभाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निकाल, नागरिक मंच या संस्थेच्या बाजूने लागला असल्याने लवकरच प्रशासनाला पाणी पट्टी बिलांमध्ये योग्य तो न्याय निवाडा झाल्याप्रमाणे बदल करून नवीन पाणी पट्टी बिले अदा करावी लागतील, अशी माहिती नागरिक मंच तळेगावचे सचिव निरंजन जहागीरदार यांनी दिली.

● नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व पाणी विभाग सभापती सुशील सैंदाणे ह्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला असून नगर प्रशासनातील कामकाजात त्यांचा गाढा अभ्यास आहे. तसेच कार्यतत्पर व कुशल प्रशासक असा त्यांचा नाव लौकिक असल्याने सैंदाणे ह्या बाबतीत काय कार्यवाही करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तळेगावकर नागरिकांना पाणी पट्टी बिलांबाबत प्रशासनाने लवकरात लवकर दिलासा द्यावा.”
— किशोर आवारे

 

निरंजन जहागिरदार

पाणी पट्टी बिलांबाबतचा निकाल आमच्या बाजूने लागला असल्याने लवकरात लवकर निकाला प्रमाणे पाणीपट्टी बिलांचे धोरण अवलंबून नागरिकांना प्रशासनाने दिलासा द्यावा. गुरुवार पर्यंतची वेळ प्रशासनाने मागितली असल्याने गुरुवार पर्यंत चित्र स्पष्ट होईल.
— निरंजन जहागीरदार 
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!