Sunday, August 31, 2025
Latest:
निधन वार्तापुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेष

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : मराठा आरक्षणाचे जेष्ठ मार्गदर्शक, देशातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटलेले, अनेक कायदेशीर प्रकरणांमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेणारे देशाचे माजी न्यायमूर्ती, कायद्याचे आणि लोकशाहीचे अभ्यासक, लोकशासन आंदोलनाचे मार्गदर्शक माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे आज दुःखद निधन झाले. पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. न्यायमूर्ती म्हणून पी. बी. सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते. 

पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचे देखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र मतभेद तसंच प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती. गोध्रा दंगलीप्रकरणी स्थापित तीन सदस्यीय ट्रिब्युनलचे देखील ते सदस्य होते. पी. बी. सावंत १९८९ ते १९९५ या काळात सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती होते. १९९५ मध्ये ते निवृत्त झाले.

माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी पी. बी. सावंत यांच्या निधनावर भावना व्यक्त करतान सांगितलं की, “त्यांची आणि माझी मैत्री ५० वर्षांची होती. न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वच क्षेत्रात आदर्श माणूस कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण होते. सामाजिक, आर्थिक प्रश्नावर त्यांनी जे निर्णय दिले त्यावर संसदेत कायदे करावे लागले. खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणी त्यांच्यातील एकही दोष दाखवू शकत नाही. माणसाने माणसासोबत कसं वागावं याचं ते उत्तम उदाहरण होते”.

बिनखर्चाची निवडणूक व्हावी असं परखड मत
निवडणूक बिनखर्चाची व्हावी आणि सेवाभावी कार्यकर्ते संसदेत असावेत असं पी बी सावंत यांचं मत होतं. “कोटय़वधींचा खर्च केल्याखेरीज निवडणूक जिंकता येत नाही हे सध्याचे वास्तव आहे. त्यामुळे अनेक जण निवडणुकीच्या खर्चाकडे गुंतवणूक म्हणूनच पाहतात. या निवडणूक पद्धतीमध्ये बदल घडून ती बिनखर्चाची व्हावी आणि सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते संसदेमध्ये प्रतिनिधी असावेत,” असं परखड मत त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केलं होतं.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!