महाबुलेटीन न्यूज : ‘झपाटलेला’ चित्रपटात बाबा चमत्कारिक ही भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन..
महाबुलेटीन न्यूज
पुणे : ‘ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा’… झपाटलेला फिल्मध्ये तात्या विंचूला असा विचित्र मृत्यूंजय मंत्र देणारा बाबा चमत्कारनं जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ (raghavendra kadkol) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राघवेंद्र कडकोळ यांनी तीन दशकं मराठी नाटक-चित्रपट, मालिकांतून दमदार अभिनय केला. राघवेंद्र यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कर्नाटकी हेल काढत बोलणाऱ्या भूमिकाच त्यांच्या वाट्याला अधिक आल्या.
‘झपाटलेला’ चित्रपटात बाबा चमत्कारिक ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ हे ८३ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
राघवेंद्र यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्यांनी अश्रूंची झाली फुले नाटकात धर्माप्पा ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती. त्यांनी ‘ब्लक अँड व्हाईट’, ‘गौरी’, ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ‘छोडो कल की बात’ या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती. बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
राघवेंद्र यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी रंगभूमीवर काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर अशा दिग्गज कलावंतांसोबत काम केले. ‘झपाटलेला’ या चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.