विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( प्रतिनिधी ) : भारतवर्षातील शुक्ल यजुर्वेदाचे मूर्धन्य विद्वान घनपाठी प.पू. श्री विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी ( वय ६५) यांचे मंगळवारी (दि.१९) पहाटे ब्राह्ममुहूर्तावर श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन अलंकापुरी क्षेत्रात पुण्यसलिला इंद्रायणी मातेच्या तीरावर प. पु. नरसिंह सरस्वती स्वामींच्या समीप इहलोकीची यात्रा संपवून वेदपुरुषाच्या चरणी स्थिरावले.
प.पू.कै.श्रीकृष्णभट्ट गोडशे गुरुजींचे परम शिष्य जोशी गुरुजींनी आपल्या गुरुजींचा विद्यावंश वर्धिष्णू केला. आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेचे असंख्य घनपाठी, क्रमपाठी, संहिता पाठी, कर्मकांड प्रवीण विद्वान घडवून भावी काळासाठी एक महत्वपूर्ण उल्लेखनीय भरीव कार्य केले.
वे.शा.सं.श्री अशोकशास्त्री कुलकर्णी गुरुजींच्या समर्थ साथीने गुरुजींनी वेदकार्याची वाटिका फुलवली. ब्राह्णणेन निष्कारणेन षडङ्गो वेदो अध्येतव्यः ज्ञेयश्च या वचनानुसार आयुष्यभर निःस्पृहतेने आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यापन कार्य केले. आपल्या गुरुकुलातील छात्रांना पोटच्या पुत्रापेक्षा अधिक स्नेह दिला. आपल्या जन्मदात्या आई वडिलांना सोडून आलेल्या बाळांना आई-वडिलांच्या ममते पेक्षाही अत्यधिक प्रेम देवून सर्वार्थाने त्यांचे भरणं पोषणच नव्हे तर यशस्वी गृहस्थाश्रमाचा आरंभही करून दिला.
विद्वान शिष्यांच्या द्वारा काशी क्षेत्रापर्यंत संपूर्ण भारतभर घनपारायणमहोत्सव वैभवात संपन्न करवून वेदकार्याची ध्वजा फडकवली. पू.गुरुजींच्या वेदकार्याची दखल प्रत्यक्ष काशी विश्वनाथाने तर घेतलीच पण तत्कालीन राज्यपाल मा. कृष्णकांत यांच्या हस्ते प.पू. विश्वेश्वरशास्त्री एवं प.पू. गणेश्वरशास्त्री द्राविड बंधुद्वयांच्या संयोजनात साङ्गवेद विद्यालयात वेदरत्न पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. गुरुजींना सर्व विद्यार्थ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.