वैशाली दाभाडे यांचा उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याकडे दिला आहे.
यावेळी जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना ताई आवारे, नगरसेवक अरुण माने, रोहीत लांघे, नगरसेविका मंगल भेगडे, हेमलता खळदे, संगीता शेळके आदी उपस्थित होते. राजीनामा मंजूर करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे दिला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले.
सद्या नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे १२ नगरसेवक असून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे या भाजपाच्या आहेत. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती, जनसेवा विकास समितीचे प्रत्येकी ७ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. पूर्वी नगरपरिषदेत भाजपाचे १४ नगरसेवक होते. मात्र प्रभाग क्रमांक ७ आणि प्रभाग क्रमांक १ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला दोन जागा गमवाव्या लागल्याने भाजपाचे संख्याबळ १२ वर आले आहे. तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी जनसेवा विकास समितीच्या पाठिंब्यावर ७ फेब्रुवारी २०२० रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली होती.
इतर सदस्यांना उपनगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळावी म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या उपनगराध्यक्षा पदाच्या कालावधीत झालेल्या कामकाजावर आपण समाधानी असल्याचे वैशाली दाभाडे यांनी महाबुलेटीनशी बोलताना सांगितले.
वैशाली दाभाडे या प्रभाग क्रमांक ९ मधून तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी उपनगराध्यक्ष तथा पाणी समितीचे सभापती म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. तळेगावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी वैशाली दाभाडे यांनी विशेष योगदान दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या नेहमी अग्रेसर राहिल्या आहेत. आता उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची माळ कोणाच्या पदरात पडते याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.