हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने चाकण येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव
पोलीस प्रशासन बातम्यांची गंभीर दखल घेते व शासनाला रिपोर्टिंग करते, त्यामुळे समाजात मीडियाला महत्व आहे : एसीपी प्रकाश धस
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना अद्यापही शासकीय मदत मिळाली नाही, ही बाब खेदजनक : किरण मांजरे
महाबुलेटीन न्यूज
चाकण : “लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून चाकण मधील पत्रकार उत्कृष्टपणे काम करतात. पत्रकारांनी आमच्यातील चुका दाखवाव्यात म्हणजे आम्ही त्यातनिश्चितपणे सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. पोलीस विभाग वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्यांची गांभीर्याने दखल घेते व त्याचे रिपोर्टिंग शासनाला करते. म्हणून समाजात वृत्तपत्र, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाला फार महत्व आहे.” असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश धस यांनी केले. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे यावेळी म्हणाले, “कोरोनाच्या काळात पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली. लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वजण घरात असताना रस्त्यावर केवळ पोलीस आणि पत्रकार आपले कर्तव्य बजावताना दिसत होते. पत्रकारांमुळे आपल्याला आपल्या परिसरातील इत्यंभूत माहिती घरबसल्या मिळत होती. कर्तव्य बजावताना अनेक पत्रकार शहीद झाले, त्यात आपल्या तालुक्यातील पत्रकार सुनील ओव्हाळ पाटील हेही कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडले. मात्र त्या पत्रकारांच्या कुटुंबियांना अजूनही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही, ही बाब खेदजनक आहे.”
आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार कै. अनंतराव भोई व पत्रकार कै. सुनील ओव्हाळ यांच्या स्मरणार्थ “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार” २०२०-२१ वितरण सोहळा चाकण येथील ऐश्वर्या आयकॉन च्या हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ पत्रकारांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
■ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्काराचे मानकरी
————————-
● संजय बोथरा – पत्रकार दैनिक केसरी
● शिवाजी आतकरी – पत्रकार, संपादक महाबुलेटीन न्यूज
● हरिदास कड – पत्रकार दैनिक सकाळ
● ॲड. विलास काटे – पत्रकार दैनिक सकाळ
● अर्जुन मेदनकर – पत्रकार दैनिक पुण्यनगरी व सामना
तसेच जेष्ठ पत्रकार व पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, माजी अध्यक्ष कल्पेश भोई, उपाध्यक्ष हमीदभाई शेख, माजी उपाध्यक्ष विवेक बच्चे, बापूसाहेब सोनवणे, ॲड. सोमनाथ नवले, पत्रकार पारधी आदी पत्रकार बांधवांना मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश धस, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, उद्योगपती अशोकशेठ भुजबळ, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, माजी अध्यक्ष हरिदास कड व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर, कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी जेष्ठ पत्रकार स्वर्गीय अनंतराव भोई, पत्रकार स्वर्गीय सुनील ओव्हाळ पाटील व कोरोनाच्या काळात शहीद झालेल्या राज्यातील ५२ पत्रकारांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
संघाचे माजी उपाध्यक्ष विवेक बच्चे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर अध्यक्ष हनुमंत देवकर यांनी आभार मानले.