पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या बिबट्याच्या बछड्याला पुन्हा आईकडे सोडले
पिंजऱ्यात अडकलेला बछडा शिताफीने पुन्हा आईच्या कुशीत
महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव ( किरण वाजगे ) : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून जगभरात ओळख असलेला जुन्नर तालुका अनेक दिवसांपासून आता बिबट्यांचा तालुका किंवा बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला आहे. येथे दररोज कोठे ना कोठे बिबट्याचे अस्तित्व असल्याचे जाणवते.
बुधवार दि. २३ रोजी देखील जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील कळमजाई शिवारात पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. मात्र पिंजऱ्यामध्ये बिबट्याच्या ऐवजी त्याचा दीड ते दोन वर्षाचा बछडा जेरबंद झाल्यामुळे वन विभागापुढे त्या बछड्याला सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. याचे कारण म्हणजे पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याच्या बछड्याला भेटण्यासाठी आतुर असलेल्या त्याच्या आईने पिंजऱ्या भोवतीच ठाण मांडले होते.
काल सकाळी येथील शेतकरी बाळू खोकराळे, शब्बीर पठाण, संदीप वायाळ यांना शेतात लावलेल्या पिंजऱ्याच्या सभोवताली एक बिबट्या फिरताना दिसला. या पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्याचा बछडा त्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे बछड्याची आई पिंजऱ्याभोवती सैरभैर होऊन फिरत होती.
ही घटना वन विभागाला कळविल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या बछड्याला शिताफीने शेजारीच असलेल्या उसामध्ये त्याच्या आईकडे सोडले.
उपवनसंरक्षक जयरामे गौडा, सहाय्यक वनसंरक्षक भिसे, वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनिषा काळे, वनरक्षक रामेश्वर फुलवाड, स्वरूप रेंगडे, वनकर्मचारी सुधीर भुजबळ, खंडू भुजबळ व विश्वास शिंदे यांनी बछड्याला रेस्क्यू करण्यासाठी परिश्रम घेतले.