खेड तालुक्यातील ग्रामपंचायत चांडोली येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या डेमोचे सादरीकरणाचा शुभारंभ
महाबुलेटीन न्यूज / प्रभाकर जाधव
राजगुरूनगर ( दि. २८ नोव्हेंबर ) : खेड तालुक्यात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर ग्रामपंचायत चांडोली येथे पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प डेमोचे सादरीकरण करण्यात आले.
राजगुरुनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चांडोली गावामध्ये कचऱ्याची भीषण समस्या ग्रामपंचायतला सतत भेडसावत होती. त्यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतच्या पुढाकारातून व स्व:उत्पन्नातून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीनचा चांडोली येथील कचरा डेपोवर प्रत्यक्ष कामकाजाच्या डेमोचे सादरीकरण करण्यात आले.
तळेगाव दाभाडे येथील श्री साई विश्व ग्रुप यांच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या व त्याद्वारे खत निर्मिती करणाऱ्या मशिन मागविण्यात आल्या. या मशिनद्वारे शून्य कचरा मोहीम यशस्वी होऊ शकते, असे मत कंपनीचे संचालक प्रवीण खंडागळे यांनी मांडले. यावेळी खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजय जोशी, खेड तालुका पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, ग्रामपंचायत प्रशासक बापूसाहेब कारंडे, ग्रामसेवक उगले, श्री साई विश्व ग्रुपच्या संचालिका पल्लवी खंडागळे, ग्रामपंचायतचे आजी माजी पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्याय प्रतिष्ठानच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन बाबत जनजागृती तसेच कचरा या विषयावर कार्यशाळा, हौसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये प्रत्यक्ष नागरिकांसोबत बैठका, मोबाईल व्हॅन व विविध पत्रकाद्वारे द्वारे जनजागृती यासारखे कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून आयोजन करण्यात येणार असून व निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे उद्घाटन न करता मशीनचे कामकाज कसे चालते याचे प्रात्यक्षिक करण्यात आले असल्याचे पर्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन बाजारे यांनी सांगितले.