काव्यमंच : येता दिवाळीचा सण
🪔येता दिवाळीचा सण🪔
मिणमिण दिव्यातून
आला दिवाळीचा सण
सुखी समृद्ध जीवन
उजळीतो कणकण॥धृ॥
सून सासुरवाशीण
कसा शीण ही सांगेन
वाट पाहते भाऊची
येता दिवाळीचा सण॥१॥
रात भरचा विसावा
हवा तिलाही म्हणून
सणा सुदीचा दिवस
असा ठेवला नेमून ॥२॥
देणं परंपरेच हे
प्रकाशाला निभवणं
सोन्याहून उजळूया
सोन्या सारखा हा सण॥३॥
हवा मायेचा आहेर
नको साडी नको खण
म्हणे सासुरवाशीण
येता दिवाळीचा सण ॥४॥
वाट माहेरची पुरी
येते डोळ्यात साठून
अन् वाटेवरल्या त्या
स्मृती येतात दाटून॥५॥
स्मृती एक एक आली
झगमग उजळून
तुझ्या दिवाळीच्या दिव्या
मिणमिण ज्योतीतून ॥६॥
-निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
:🪔:🪔:🪔:🪔::🪔:🪔:🪔:🪔:🪔:🪔: