नारायणगाव उपबाजार मध्ये दोन गटांत तुफान हाणामारी, सोळा जणांवर गुन्हा दाखल
बाजार समितीच्या आवारात अल्पवयीन मुले काम करतातच कशी ? नागरिकांचा सवाल
महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजाराच्या आवारात बुधवार दि. ०४ रोजी सायंकाळी दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत परस्पर विरोधी गटातील १६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेतील ६ जण अल्पवयीन मुले आहेत. लोखंडी रॉड तसेच लाठ्या काठ्यांनी झालेल्या मारहाणीची आज दिवसभर वारूळवाडी व नारायणगाव परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी माहिती दिलेल्या माहितीनुसार,
जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार आवारात पिकअप गाडी मध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील माल भरण्याच्या कारणावरून वाद होऊन पप्पू भुमकर, अक्षय तलवार, रोहन सपकाळ , कुणाल जंगम व इतर ४ अल्पवयीन मुले ( सर्व राहणार नारायणगाव) यांनी बेकायदेशीर गर्दी जमवून हातात लोखंडी रॉड व काठ्या घेऊन येऊन काही एक न विचारता खाली पाडून लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारले. तसेच त्यांच्याबरोबर आलेल्या मुलांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद साई संदीप पवार (वय २०, धंदा शेती, राहणार पाटे खैरे मळा, नारायणगाव) याने दिली.
दुसऱ्या घटनेत आरोपी साई पवार, सागर खैरे, दत्ता कराडे, नयन खैरे, विशाल पवार, बंटी खैरे व इतर २ अल्पवयीन मुले ( सर्व राहणार पाटे -खैरे मळा, नारायणगाव) या सर्वांनी बेकायदेशीर गर्दीचा जमाव जमवून हातात लोखंडी रॉड व काठ्या घेऊन येऊन लोखंडी रॉड हातात घेऊन व इतर लोकांनी तक्रारदारास पाठीवर छातीवर पोटावर मारले व त्यांचे बरोबर असलेल्या मुलांनी मला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली व दुखापत केली अशी फिर्याद रोहन गणपत सपकाळ (वय १८ वर्षे, राहणार नारायणगाव) याने दिली.
दरम्यान बाजार समितीच्या आवारात झालेल्या या प्रकारामुळे बाजार समितीच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. बाजार समितीमध्ये बाहेरील मुले आत येतातच कशी, तसेच अल्पवयीन मुले गाड्या भरण्याचे व खाली करण्याचे काम करतात तरी कशी ? असा सवाल सर्वसामान्य नागरीक व येथे येणारे शेतकरी करीत आहेत. या प्रकारामध्ये बाजार समिती नेमकी काय करते? व्यापारी आणि आडतदार यांच्यावर बाजार समितीचा वचक आणि अंकुश नाही का ? असाही सवाल उपस्थित होत आहे. या मारामारीचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासणी करून नेमकं काय घडलं याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्याकडून केली जात आहे.