चायनीज गाडी लावण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी, तीनजण जखमी, ११ जणांवर गुन्हा दाखल…
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : चायनीज गाडी लावण्याच्या कारणावरून दोन हॉटेल व्यवसायिकांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी नगरसेवकासह दोन्ही गटातील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एकूण ११ जणांवर येथील पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाणामारीचा हा प्रकार मंगळवारी (दि.३) सकाळी ८.३० च्या सुमारास तळेगाव स्टेशन भागातील मनोहर नगर मधील सत्यकलम कॉलनी येथे घडला. या संदर्भात माजी नगरसेवक सुनील मारुती कारंडे (वय ४९ रा. मनोहर नगर, सत्यकलम कॉलनी, तळेगाव दाभाडे) आणि आदित्य पोपटराव सुर्वे (वय२७, रा. मनोहर नगर, तळेगाव दाभाडे) यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे.
या हाणामारीत काठी, लोखंडी रॉड आणि दगडांचा वापर करण्यात आला आहे. सुनील कारंडे, पोपटराव सुर्वे, आदित्य सुर्वे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर
तळेगाव स्टेशन येथील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुनील कारंडे यांनी दिलेल्या फिर्यादी, नुसार पोपट सुर्वे, त्यांची पत्नी , मुलगा आदित्य व एक अनोळखी इसम यांनी दगड आणि लोखंडी रॉडने राहत्या घराजवळ येऊन मारहाण केली.
तर आदित्य पोपटराव सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार,
शिवाजी मारुती कारंडे, सुनिल कारंडे, ऋषीकेष कारंडे, प्रथमेश कारंडे, शैलेश कारंडे, मारुती कारंडे, शिवाजी कारंडे यांची पत्नी यांनी काठीने, दगडाने, लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहरनगर गेट जवळ सुर्वे व कारंडे यांचा हॉटेल व्यवसाय आहे. या ठिकाणी चायनीज गाडी लावण्यावरून वाद निर्माण झाला. यातून हणामारीचा प्रकार घडला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी करत आहे.