‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमाअंतर्गत मंचर येथे गुढी महोत्सव
महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
मंचर : सध्या देशभरात नव्हे तर जगभरात कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे हाहाकार माजविला आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत गाव पातळीवर मंचर ता. आंबेगाव येथे गुढी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प मंचर बिट अंतर्गत अंगणवाडी केंद्र जुना बाजार मंचर येथे कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम गुढी उभारून राबविण्यात आला. या कार्यक्रमात रांगोळी व पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली. जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधत ज्या पालकांनी एक किंवा दोन मुलींवर कुटूंब नियोजन केले आहे. त्या मातांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. बारभुवन, पर्यवेक्षक अनिता हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर बिट मधील सेविका आणि मदतनीस यांनी केले होते, अशी माहिती एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प मंचर बिटच्या सेविका कल्पना पंदारे यांनी दिली.