Saturday, April 19, 2025
Latest:
इतरखेडपुणे जिल्हाभावपूर्ण श्रद्धांजलीविशेष

रानमळा पॅटर्नचे खरे खुरे आधारस्तंभ होते भाऊ…

 

आजची तारिख १०-१०-२०२० परत कधीच येणार नाही, असा मेसेज कालपासुन फिरत होते.
खरंच ही तारिख परत येणार नाही आयुष्यात आणि येवुही नये. दिवस उजाडला तोच माजी आमदार सुरेश भाउंच्या निधनाच्या वार्तेनं.

मन सुन्न झालं. आमच्या शिंदे परिवाराचे अत्यंत जवळीक असणारे कौटुंबिक स्नेही असणारे भाउ आज निघुन गेले आपल्यातुन.

आमच्या कुटुंबियांचा जरी जुना स्नेह असला तरी माझा वैयक्तिक संपर्क २००२ पासुन आला भाउंशी. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणुन माझे वडिल आणि ते निवडुन आले. त्याच टर्म मधे उपाध्यक्ष म्हणुनही कारकिर्द गाजवली.

तेंव्हापासून भाउंना पाहिलं ते राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रमलेलं. कधीही विरोधकांबद्दल अपशब्द किंवा सुडाची भावना न बाळगता “टिकेला उत्तर कामातुन द्यायचं असतं” म्हणत कार्यरत असलेला सेवारती. भाउ शब्द उलट वाचला की उभा असं होतं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मागं खंबीरपणे उभा रहाणारा हा तालुक्याचा भाउ होता.

सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजना असो की, महात्मा फुले मित्र मंडळामार्फत होणारे सामुदायिक विवाह, आजिबात आपली टिमकी न वाजवता निरलस वृत्तीनं काम करणारं हे शांत संयमी सुसंस्कृत नेतृत्व.

खरं तर राजकारणाचा पिंड आजिबात नसलेला आणि राजकारण्यांची लक्षण नसलेला हा माणुस फक्त आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आमदारकीला गवसणी घालतो हेच आश्चर्य होतं. आपल्या आमदारकीच्या काळातही कुठेही भडक वक्तव्य अथवा राडेबाजी न करता एका वेगळ्याच पध्दतीनं प्रशासनावर वचक ठेवुन अशांत असलेला तालुका शांततेकडं नेण्याचं काम करणारे भाउच होते. आपल्याच कामाची जाहिरात करण्यात इतर राजकारण्यांपेक्षा ते कमी पडत असल्यानं कदाचित त्यांच्यावर आरोप व्हायचे पण आजवरच्या कारकिर्दीत अंगावर वैयक्तिक बदनामी किंवा घोटाळ्याचा एकही डाग न पाडता अनेक महत्वपूर्ण कामं मार्गी लावली.

आमच्या रानमळा गावावर विशेष प्रेम असणारे भाउ आमच्या रानमळा पॅटर्नचे खरे खुरे आधारस्तंभ होते. जवळपास पंधरा ते अठरा वर्ष या माणसानं दरवर्षी दिड ते दोन लाख रुपये आपल्या स्वतःच्या खिशातुन खर्च करुन फळझाडांची रोपं पुरवायचं काम केलं. त्यात कुठेही नाव किंवा कार्यक्रम असा आग्रह नव्हता.

प्रत्येक निवडणुकीला मुख्य रस्ता ते आमची वाडी यांना जोडणारा रस्ता याचं भुमिपुजन व्हायचं. आजवर आठ ते दहा वेळा हा प्रकार झाला होता, मात्र आपल्या आमदारकीच्या काळात हा रस्ता मंजुर करुन न थांबता मुख्यमंत्री सडक योजनेतुन थेट चार किमीचा कॉंक्रिटरस्ता करुन आपला शब्द खरा केला.

तालुक्यातील अनेक प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यायला लावुन ते मार्गी लावले.

राजकारणात दुर्मिळ असलेली विनयशिलता, ऋजुता, संयम, सुसंस्कृतता आणि सर्वांशीच तितक्याच तळमळीनं आणि आपुलकीनं वागणारं व्यक्तिमत्व परत होणे नाही.

रस्त्यात दिसलो तरी गाडी थांबुवुन “काय मिलिंदराव, काय चाललंय?” हा आपुलकीचा आवाज आता ऐकायला मिळणार नाही परत मला कधीच.

भाउ, तुमच्या जाण्यानं आम्ही शिंदे परिवार आणि रानमळा गावानं मोठा आधार गमावलाय आज, श्रध्दांजली वहायला पण मन धजावत नाहीए अजुन.

आम्हा परिवाराच्या वतिनं आणि समस्त रानमळा ग्रामस्थांच्या वतिनं आपल्याला भावपुर्ण आदरांजली ..!!

– मिलिंद शिंदे ( पत्रकार )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!