Friday, August 29, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाविशेष

हॉटेल व रेस्टोरंटमध्ये खवय्यांची वाढली वर्दळ

 

महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरुनगर : सोमवारपासून हॉटेल रेस्टॉरंट सुरू होणार असल्याचे राज्यशासनाने तीन दिवस आगोदरच जाहीर केले होते. त्यामुळे सहा महिने बंद असलेल्या हॉटेलांमध्ये साफसफाई करण्यात आली. हॉटेल रेस्टॉरंट सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी संकष्टी आणि सोमवार असल्याने अनेक जणांचा नाईलाज झाला.

सोमवारी उपवास करणाऱ्या बरोबरच संकष्टी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे उपवासाच्या नाश्त्यासाठी खास असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये या ग्राहकांची गर्दी होती. तर उपवास नसणार्यांनी मात्र खूप दिवसांनी हॉटेलमध्ये बसून नॉनव्हेजवर ताव मारणे पसंत केले.

झणझणीत रसरशीत रस्सा आणि चिकनवर ताव मारण्यासाठी खवय्यांच्या गर्दीने मंगळवार आणि बुधवारी शहरातील हॉटेल रेस्टॉरंट गजबजून गेले होते.

शासन नियमांचे पालन करून शहरातील हॉटेल व बार रेस्टॉरंट सुरू झाली असून परिसरातील खवय्यांची वर्दळ पुन्हा वाढली आहे. वेळेच्या बाबतीत स्पष्ट आदेश नसल्याने काही हॉटेल रात्री दहा तर काही अकरा वाजेपर्यंत सुरू होती. कोरोनामुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते.

शासनाकडून ५ ऑक्टोबर पासून काही नियमांचे पालन करुन हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. गेल्या महिन्यात हॉटेल व रेस्टॉरंट मधून पार्सल सेवा सुरू असली तरी हॉटेलमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेण्याची मजा काही वेगळीच आहे. राजगुरूनगर मधील नॉनव्हेज बरोबर मिसळ तितकीच लोकप्रिय आहे. त्यामुळे शहरातील व परिसरातील हॉटेल व रेस्टोरेंट मधून सकाळपासूनच ग्राहकांनी गर्दी केली होती.

ग्राहकांचे थर्मल गनद्वारे स्कॅनिंग करणे. सॅनिटायझरचा वापर करूनच ग्राहकांना प्रवेश देणे. मोजक्याच बैठकीसाठी ग्राहकांना परवानगी देणे. या सर्व नियमांचे पालन करून हॉटेल सुरू करण्यात आल्याचे गुडलक हॉटेलचे मालक दिनेश सांडभोर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!