कोविड योद्धा शिक्षक हरपला..!!
तिन्हेवाडी येथील त्रिमूर्ती विद्यालयातील आदर्श शिक्षक संभाजी शांताराम सांडभोर यांचे निधन
——————
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील तिन्हेवाडी गावच्या त्रिमूर्ती विद्यालयाचे आदर्श शिक्षक श्री. संभाजी शांताराम सांडभोर (वय ४४) यांचे दुःखद निधन झाले.
सांडभोर हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व पंचायत समिती खेड यांनी दिलेल्या गाईडलाईननुसार सर्व्हे टीममध्ये सलग सहा महिने आपले कर्तव्य बजावत होते. ह्याच कालखंडात दिनांक १२ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझीटिव्ह आल्याने त्यांनी सुरवातीला खेड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडवरील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचार घेऊन त्यांना घरी देखील सोडण्यात आले होते, मात्र दोन दिवसांनी श्वासोच्छ्वासाचा तीव्र त्रास सुरू झाल्याने त्यांना राजगुरूनगर व भोसरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोविडमुळे इतर अवयवांवर गंभीर दुष्परिणाम झाल्याने व तिथे प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज शुक्रवार दिनांक २ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूनंतर त्यांची कोविड चाचणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे जहांगीर रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
कोविडमुळे इतर अवयवांवर गंभीर दुष्परिणाम होत असून कोविडवर मात केलेल्या रुग्णांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. खेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात कै. संभाजी सांडभोर सर यांनी केलेल्या कार्यामुळे ते विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये प्रिय होते. त्यांच्या निधनाने खेड तालुक्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, एक मुलगा-मुलगी (वय १० व ५ वर्षे) असा परिवार आहे. त्रिमूर्ती विद्यालयाचे विश्वस्त श्री. सुनील सांडभोर यांचे ते बंधू होत.