पश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रातही एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे व तमाशाला परवानगी मिळावी : लक्ष्मीकांत खाबिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे महा कला मंडळ या शिखर संस्थेने केली मागणी
महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : राज्यातील सर्व प्रकारची मनोरंजन केंद्रे सुरू करण्याची मागणी ‘महा कला मंडळ’ या कलाकारांच्या विविध संघटनांची शिखर संस्था असलेल्या संघटनेने केली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेली सहा महिने बंद असलेली मल्टिप्लेक्स थिएटर, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, लोकनाट्य तमाशा थिएटर, लावणी कला केंद्र तसेच इतर सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे या सर्वांवर अवलंबून असलेले सर्व कलाकार व त्यांची कुटुंबे हलाखीचे जीवन जगत आहेत. अनेकांची उपासमार देखील होत आहे.
यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक ऑक्टोबर पासून सर्व मल्टिप्लेक्स, थिएटर, कला केंद्र, नाट्यगृहे सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रकारची थिएटर, नाट्यगृहे, तमाशा कला केंद्र, लावणी कला केंद्र व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी महा कला मंडळ या कलाकारांची शिखर संस्था असलेल्या संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी केली आहे.