किरकोळ कारणावरून वृद्धाचा खून
आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी पहा ऑनलाईन महाबुलेटीन न्यूज
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
भोर : तालुक्याच्या पश्चिमेकडील वेणूपुरी ता.भोर येथे शेजारच्या वृद्ध आजींना रात्रीच्यावेळी मारहाण का केली, हे विचारण्यास गेलेल्या बाळू सावळा वेणूपुरे ( वय-६५ ) या वृध्दाच्या खांद्याच्या गळ्याजवळ लोखंडी वीळ्याने एका तरुणाने वार करून खून केला. ही घटना रविवार ( दि. १३ ) रात्री घडली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेणूपुरी येथील सोनाबाई नथुराम पारठे ( वय- ५९ ) यांच्या घरी रात्री ११ च्या सुमारास शेजारील वस्तीतील अजित आनंदा सपकाळ ( वय-२७ ) गेला व दरवाजा वाजविला. सोनाबाई यांनी दरवाजा उघडून माझ्या घराचा दरवाजा रात्रीचा का वाजविला, म्हणून विचारले असता अजित सपकाळ याने आज्जींना लाकडी फळी डोक्यात मारून जखमी केले. सोनाबाईनी आरडा ओरडा करीत शेजाऱ्यांना हकीगत सांगितली. त्यानंतर शेजारील बाळू सावळा वेणूपुरे अन्य तीन जनांसह आरोपी अजित सपकाळ यास सोनाबाई यांना मारहाण का केली विचारण्यास गेले. मात्र तेथे शाब्दिक वादीवाद झाला. याचा राग मनात धरून आरोपी अजित सपकाळ याने बाळू सावळा वेणूपुरे यांच्या घरी रात्री १ वाजता जाऊन शिव्या देत लोखंडी विळ्याने खांद्याच्या गळ्याजवळ वार केले आणि आरोपी रात्रीचा फायदा घेत फरार झाला. यात बाळू वेणूपुरे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. अशी फिर्याद गणेश मारुती वेणूपुरे यांनी भोर पोलिसात दिली. पोलीस निरीक्षक राजु मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पवार पुढील तपास करीत असून पोलिस कर्मचारी उद्धव गायकवाड, विकास लगस, अमोल मुर्हे, अनिल हिप्परकर, बाळासाहेब थोपटे यांनी एक तासात आरोपीस बेड्या ठोकल्या.
—