कोरोनाबाधित पञकारांना वैद्यकीय सुविधा व आर्थिक मदत करावी – एम. जी. शेलार
मराठी पञकार परिषदेच्या आवाहनानुसार कोरोनामुळे निधन पावलेल्या १३ पत्रकारांना श्रध्दांजली
सासवड येथे पुणे जिल्हा पञकार संघ व पुरंदर तालुका पञकार संघाच्या वतीने श्रध्दांजली सभेचे आयोजन
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
सासवड, दि. ११ : जगभर थैमान घालून लाखो लोकांचे जीव घेणा-या कोरोना रोगांमुळे सर्वञ भयानक परिस्थिती ओढावलेली आहे. कोरोना रोगाचा मुकाबला करण्यासाठी अनेक घटक अहोराञ झुंजत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पञकार कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासनास सहकार्य करुन जनजागृतीचे कार्य करीत आहे. परंतु कोविड-१९ ने बाधित होणार्या पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यभरातील पञकार कोरोनामुळे मुत्यूमुखी पडत आहेत. या कोरोनारुपी संकटामुळे अनेक पञकारांची घरे उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे शासनाने व समाजातील दानशूर व्यक्तींनी कोरोनाबाधित पञकारांना वैद्यकीय सुविधा व आर्थिक मदत करावी, असे आवाहन मराठी पञकार परिषद पुणे प्रतिनिधी एम. जी. शेलार यांनी केले.
सासवड ( ता.पुरंदर ) येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पुणे जिल्हा पञकार संघ व पुरंदर तालुका मराठी पञकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस, माथेरानचे पत्रकार संतोष पवार आणि राज्यातील अन्य १३ दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी एम.जी.शेलार बोलत होते.
मराठी पत्रकार परिषदेच्या झालेल्या झुम बैठकीत दिवंगत पञकारांना श्रद्धाजंली वाहण्याच्या निर्णय घेण्यात आला. बैठकीस तीस जिल्हयातील प्रतिनिधी हजर होते. मराठी पत्रकार परिषदेशी ३५ जिल्हे आणि ३५० तालुका पत्रकार संघ असलेल्या सर्व ठिकाणी श्रध्दांजली सभांचे आयोजन सोशल डिस्टस्टिंगचे पथ्य पाळत करण्यात आले.
मराठी मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार व मराठी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा पञकार संघ व पुरंदर तालुका मराठी पञकार संघाने श्रद्धाजंली सभेचे आयोजन केले होते.
यावेळी पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका मराठी पञकार संघाचे अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, जेष्ठ पञकार प्रदिप जगताप, सुधीर गुरव, बाळासाहेब कुलकर्णी, कार्यकारीणी सदस्य संभाजी महामुनी, जीवन कड, निलेश झेंडे, बहुजन हक्क परिषद संस्थापक सुनील धिवार, चंद्रकांत चौंडकर, विशाल फडतरे, सचिन मोरे, मोहन तळेकर, किशोर बसाळे आदी उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर म्हणाले, सध्या सर्वञ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून पञकार प्रशासनास सहकार्य करीत आहेत. कोरोनाबाधित पत्रकारांची वाढती संख्या आणि विद्यमान व्यवस्थेत त्यांची होणारी हेळसांड टाऴण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित येणार्या खासगी रूग्णालायात बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डाँ. राजेश देशमुख यांना पुणे जिल्हा पञकार संघाने देवून सविस्तर चर्चा केलेली आहे, त्याचीही अंमलबजावणी तातडीने होणार आहे.
यावेळी पञकार संघाचे कार्यकारीणी सदस्य, पञकार संभाजी महामुनी म्हणाले, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न व समस्या सोडविणारे पञकार समाजसेवेचे कार्य करीत आहेत. सध्या कोरोनारुपी राक्षसाने सर्वच क्षेञांना जबरदस्त तडाखा दिलेला आहे. अनेक पञकारांचे जीव असुविधेमुळे गेले आहेत. त्याची आर्थिक झळ पञकारांना पोहचलेली आहे. शासनाने पञकारांना प्राधान्याने सर्वोतोपरी मदत करावी.
कार्यक्रमाचे प्रास्तविक दत्तानाना भोंगळे यांनी केले. सुञसंचालन प्रदिप जगताप यांनी केले. तर आभार सुधीर गुरव यांनी मानले.