तालुक्यात दोन हजार कोरोना रुग्णांच्या उपचाराची सोय करणार : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : तालुक्यात किमान दोन हजार कोरोना रुग्णांच्या उपचाराची सोय होवू शकेल असे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज ( दि.३ सप्टेंबर ) येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या शासकीय अधिका-यांच्या कोरोना आढावा बैठकीत अध्यक्षपदावरुन बोलताना दिली.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त अधिकारी हेमंत खराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर, बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी या बैठकीस उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९१६ झाली आहे. तपासण्या वाढवल्याने सकृतदर्शनी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यासारखे दिसत आहे. तथापि लोकांनी घाबरुन जावू नये. कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करुन घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार निधीतून अद्यावत, सुसज्ज ॲम्बुलन्सची सोय करण्यात येईल. बावडा निवासी ठिकाणी नवीन कोविड सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले की, कोरोना तपासणीस वेग आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात कोरोना चाचणीचा वेग तिप्पट वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते आहे. पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग विशेषतः इंदापूर, बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात ते प्रकर्षाने जाणवत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यू होण्याचा दर कमी करण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. इंदापूर तालुक्यात ऑक्सिजन बेडसाठी निधी उपलब्ध केला आहे.११० बेड व अठरा व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्याचे बांधकाम विभागाला आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तपासणी व कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधणे हे आव्हान आहे. त्या मोहिमेस त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने कोविड उपचार केंद्र कार्यान्वित करण्याची सूचना दिली. प्रशासकीय यंत्रणेतील अधिका-यांनी समन्वय ठेवावा ,असा आदेश त्यांनी दिला.
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्याधिकारी डॉ.सुरेखा पोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास शेळके, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रघुनाथ गोफणे व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.
●● या आढावा बैठकीच्या वेळी पत्रकारांना निंदनीय वागणूक देण्यात आली. या बैठकीसाठी राज्यमंत्री भरणे यांच्या वतीने दुपारी एक वाजता पत्रकारांना बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांनीच अधिका-यांची बैठक थोडक्या वेळात संपणार आहे, असे सांगून त्यानंतर तुम्हाला बोलावू असे सांगितले. चहाची व्यवस्था करुन सभागृहाचे दार बंद करण्यात आले. दुपारचे अडीच वाजले तरी दरवाजा उघडला नाही. काही अपवाद वगळता बहुतेक पत्रकार दरवाजा उघडण्याची वाट पाहून निघून गेले. जर आत घ्यायचेच नव्हते, तर बोलवायचे कश्याला हा प्रश्न सर्व पत्रकारांना पडला होता.
_____