Friday, April 18, 2025
Latest:
आर्टिकलगणेशोत्सवपुणे जिल्हाबारामतीविशेषसण-उत्सव

अष्टविनायक : मोरगावचा मयुरेश्वर

अष्टविनायक : मोरगावचा मयुरेश्वर

महाबुलेटीन नेटवर्क
मोरगांव हे अष्टविनायकापैकी हे प्रथम स्थान मानले जाते. येथील गणपतीस मयुरेश्वर या नावाने संबोधले जाते. मयुरेश्वराची मुर्ती स्वयंभु आहे. याबाबत काही ग्रंथांचा आधार घेतला असता ब्रम्हा, विष्णु, महेश, सुर्य व शक्ती या पंच देवतांनी मुर्तीची स्थापना त्रेतायुगात केली असल्याचा दाखला मिळतो. मुर्ती स्वयंभू असल्याने आजही गावात घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी गणपती उत्सव काळात श्रींची स्थापना केली जात नाही. गणपती उत्सव काळात गावातील ग्रामस्थ व गणेश भक्त मयुरेश्वराचीच पुजा-अर्चा, मनो, आरधना करतात. बहामनी राजवटीतील हे मंदिर असुन काळ्या पाषाणातील बांधकाम आहे. मंदिर उत्तराभिमुख असुन सभोवतालची तटबंदी जमीनीपासुन पन्नास फुट उंच आहे. मुर्ती उत्तराभिमुख असुन गणपतीच्या मस्तकावर नागफणा आहे. मुर्तीच्या डाव्या व उजव्या बाजुला हलवता येण्यासारख्या सिद्धी – बुद्धीच्या मुर्ती आहेत, तर श्रींच्या बेंबीत हिरा आहे. मोघल राजवटीत हिंदुंच्या मंदिरावर आक्रमण होत होते. या आक्रमणापासुन बचावासाठी मुस्लिम मशीदीप्रमाणे मंदिराच्या चारही कोपऱ्यावर चार मिनार होते. तर आजही मंदिर प्रवेशद्वार मुसलमान पद्धतीच्या बांधणीप्रमाणे पहावयास मिळते.

सिंधू नावाच्या राक्षसाने पृथ्वी, आकाश, पाताळ यावर उन्मात माजवला होता. यामुळे गणपतीने सिंधूचा वध मोरावर बसुन केल्यामुळे पंच देवतांनी गणेशास मयुरेश्वर या नावाने संबोधले. या तिर्थक्षेत्री महान साधु मोरया गोसावी यांनी साधना केली असून त्यांचे जन्मस्थळ मंदिरापासुन एक किमी अंतरावर तर समाधी पुण्या जवळील चिंचवड येथे पवना नदी काठी आहे. सुखकर्ता दुख:हर्ता ही आरती याच मंदिरात रामदास स्वामींना स्फुटली आहे. ब्रम्हदेवाच्या हातुन कमंडलु कलंडुन कऱ्हा नदी काठी गणेश कुंडाची निर्मीती झाली अशी आख्यायिका आहे. याच्या केवळ दर्शनाने काशी यात्रेचे पुण्य मिळते. हे कुंड नदीकिनारी आजही पहावयास मिळते. गणेश योगींद्राचार्य, जगतगुरू तुकाराम महाराज येथे काही काळ वास्तव्यास असल्याचा अनेक ग्रंथामध्ये दाखला मिळतो.

मंदिरामध्ये कल्पवृक्षाचे झाड असुन याच झाडाखाली महान साधू मोरया गोसावी यांना मयुरेश्वराने दर्शन दिले आहे. या झाडास पृथ्वीवरील कल्पवृक्ष असे संबोधले जात असून मनोकामना पुर्ण करणारा हा वृक्ष म्हणून प्रचलीत आहे. मंदिरामध्ये गणेशाची विविध रुपे असणाऱ्या ४२ परीवार मुर्ती असून माघ व भाद्रपद महीन्यात यांना दुर्वा पाहण्याची विशिष्टअशी प्रथा गेल्या ५०० वर्षापासुन आजही प्रचलीत आहे. या मयुरेश्वर नगरीत प्रवेश करण्यासाठी चार दिशांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशी चार द्वार आहेत. माघ व भाद्रपद महीन्यामध्ये या द्वार ठिकाणी अनवाणी चालत जाऊन दुर्वा, फुले, मांदार, शमी वाहीली जाते.

मयुरेश्वराच्या दर्शन घेण्याच्या अगोदर येथे मयुरेश्वराचा द्वारपाल नग्नभैरवाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. नग्नभैरवाचे मुख्य स्थान मंदिरापासुन ४ किमी अंतरावर असल्याने भक्तांना भैरवाचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिरात नग्न भैरवाच्या प्रती मुर्तीची स्थापना केली आहे. शिवकाळात गोळे नावाच्या सरदारकडे वाघु अण्णा वाघ यांकडे तोफखान्याची जबाबदारी होती. यावेळी त्यांनी काही तोफा मयुरेश्वरास अर्पण केल्या होत्या. पैकी पाच तोफा आजही येथे पहावयास मिळतात. विजयादशमीस सीमोल्लंघनास मयुरेश्वर पालखीसमोर रंगीत दारुचे शोभकाम, फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी दिली जाते. मंदिरात दोन दिपमाळ असुन मंदिराबाहेर मोठा उंदीर व दगडी कासव आहे. मंदिरासमोरील दगडी चिरेबंदी फरसावर भला मोठा काळा पाषाणातील नंदी पहावयास मिळतो. भारतात असणाऱ्या गणपती मंदिरासमोर केवळ येथेच नंदी पहावयास मिळतो, असे बोलले जाते.

भेट देण्यासाठी वर्षातील सर्वोत्तम काळ कोणता? – माघ व भाद्रपद महीन्यातील शुद्ध प्रतीपदा ते पंचमी

एरवी मुर्ती सोहळ्यात असल्याने सर्व धर्मीयांना मुख्य मूर्ती गाभाऱ्यापर्यंत जाता येत नाही. मात्र माघ व भाद्रपद महीन्यामध्ये मुख्य मूर्तीस अभीषेक व जलस्नान घालण्याची पर्वणी साधता येते. मोरगांवचा गणपती मानाचा व पहीला गणपती असून गणेशाच्या साडेतीन पिठापैकी पुर्ण पिठ मानले जाते. ज्या भावीकांना अष्टविनायक यात्रा करायची आहे . त्यांनी मोरगांवपासुनच करावी. सुट्टीच्या दिवशी या तीर्थक्षेत्री मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामुळे सुलभ अष्टविनायक यात्रेसाठी सुट्टीच्या व्यतीरीक्त दिवस निवडावा. मंदिर बाराही महीने पहाटे पाच ते रात्री १० वाजेपर्यंत उघडे असते. माघ व भाद्रपद महीन्यामध्ये शुद्ध प्रतीपदा ते शुद्ध पंचमी या काळात पहाटे पाच ते दुपारी १२ वाजेपर्यंत मुख्य मुर्ती गाभाऱ्यापर्यंत जाता येते. याच काळात मोरया गोसावीप्राप्त मंगलमुर्ती पालखी सोहळा चिंचवड येथून मयुरेश्वर भेटीसाठी येतो. मंदिराचे व्यवस्थापन चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून होत आहे. एरवी श्रींस दररोज सकाळी खिचडी भात व पोळी , दुपारी पोळी- भाजी, भात वरण तर सायंकाळी दूध भाताचा नैवद्य दाखविण्यात येतो. दररोज मुर्तीची पहाटे प्रक्षाळ पुजा, सकाळी ७ वाजता, दुपारी बारा व तीन वाजता अशा पुजा असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाक्तांसाठी ट्रस्टच्यावतीने दुपारी १२- २ यावेळेत अन्नसत्र सुरु केले असून भक्तांना राहण्यासाठी प्रशस्त भक्त निवास बांधले आहे. मंदिरामध्ये नव्याने बांधलेली लाकडी दर्शन रांग तसेच श्रींच्या मुर्ती भोवती बनवलेली मखर व प्रभावळ पर्यटक व भक्तांचे लक्ष वेधून घेते.

माघ व भाद्रपद या मराठी महीन्यामध्ये शुद्ध प्रतीपदा ते शुद्ध तृतीया या काळात अदिलशाही काळातील पुरातन दागिने मयुरेश्वरास चढविले जातात . हे दागिने भरजडीत , हिरे, माणिक ,मोती युक्त सुवर्ण आहेत .एरवी मुर्तीवर सुवर्णलंकार चढविले पहावयास मिळत नाहीत. गेल्या शंभर वर्षात पहील्यांदाच कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने यंदा भावीकांना मुक्त द्वार दर्शनाचा लाभ घेता आला नाही.

शब्दांकन : विनोद पोपटराव पवार – विश्वस्त ( चिंचवड देवस्थान ट्रस्ट ) मो – 9922558846

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!