खालुंब्रे येथील माऊली सोशल फाउंडेशनकडून महाळुंगे कोविड सेंटरला १५० बॉक्स मिनरल वॉटर भेट
एक हात मदतीचा….
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : खेड तालुक्यातील महाळुंगे गावातील म्हाडा काॅलनी मध्ये असलेल्या कोरोना कोविड सेंटर मधील रुग्णांना खालुंब्रे गावातील माऊली सोशल फाऊंडेशन तर्फे मिनरल वाॅटरचे १५० बाॅक्स मदत म्हणून देण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. खेड तालुक्यात देखील दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शासनाच्या वतीने महाळुंगे गावातील म्हाडा इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. तिथे कोरोना संशयित व कोरोना पाॅझिटीव रुग्णांना राहण्याची सोय शासनाने केली आहे. त्या सर्वांना शासनाच्या वतीने जेवण व नाष्टा दिला जातो, परंतु पिण्याचे पाणी नळाचे आहे. तिथल्या रुग्णांची मागणी होती कि, त्यांना पिण्यासाठी मिनरल वाॅटर मिळावे, कारण पावसाळ्याचे दिवस असल्याने बाहेरचे पाणी पिणे रुग्णांसाठी थोडे अपायकारक आहे. रुग्णांच्या कुटुंबीयांना तिथे पाणी-जेवण घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही. म्हणून हि गरज ओळखून खालुंब्रे गावातील माऊली सोशल फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी स्वखर्चाने आज १५० मिनरल वाॅटरचे बाॅक्स मोफत दिले.
माऊली सोशल फाऊंडेशनच्या ह्या कामाचे खेड तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, उपसभापती भगवानराव पोखरकर, गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी कौतुक केले. ह्या उपक्रमामध्ये माऊली सोशल फाऊंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी योगदान दिले.