जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा
व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे साजरा करण्यात आला जागतिक युवा कौशल्य दिन
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : कौशल्य विकास व उदयोजकता विभागामार्फत सन २०१५ पासून जागतिक युवा कौशल्य दिन (१५ जुलै ) दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावेळी जिल्हयातील सुचिबद्ध प्रशिक्षण संस्थापैकी उत्कृष्ट काम करणाच्या प्रशिक्षण संस्थांना या दिवसाचे औचित्य साधून गौरविण्यात येते. परंतु या वर्षी सर्वत्र उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपदवारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे-११ या कार्यालयाच्यावतीने जागतिक युवा कौशल्य दिन २०२० यशस्वीरित्या साजरा करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केद्रांच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातीन ५० पेक्षा जास्त प्रशिक्षण संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदविला. सहायक आयुक्त श्रीमती पवार यांनी सहभागी झालेल्या सर्वांशी संवाद साधत आगामी काळातील कौशल्य विकास प्रशिक्षणाचे स्वरुप, स्किल इंडिया पोर्टलच्या माध्यमातून करावयाचे कामकाज तसेच आंतरवासिता ( अप्रिंटिसशीप ) पोर्टल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सहभागी प्रशिक्षण संस्थांच्या याअनुषंगाने असलेल्या शंकांचे निरसन प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करण्यात आले.
यानंतर कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात जिल्ह्यातील विविध सूचीबद्ध प्रशिक्षण संस्थांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजू लोकांसाठी अन्नदान, रोख रकमेची मदत, मुखपट्टी ( मास्क ) वाटप, आरोग्य विषयक सेवा पुरविण्यामध्ये सहभाग अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याकरीता उल्लेखनीय कामे केलेल्या प्रशिक्षण संस्थांचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे कार्यालयाकडून ऑनलाईन पध्दतीने सन्मानपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या आपत्ती काळात हेल्थकेअर क्षेत्रातील जास्तीत जास्त प्रशिक्षित उमेदवारांनी वैदयकीय सेवा देण्याकरीता पुढाकार घ्यावा याकरिता संबंधित सर्व प्रशिक्षण संस्थांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती पवार यांनी पुणे केले.