Friday, May 9, 2025
Latest:
कोरोनापुणेविधायक

प्लाझ्मा बँक स्थापन करण्यासाठी कोरोनामुक्त व्यक्तींना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : कोव्हिड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा ( रक्तद्रव ) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते, हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु असे लक्षात आले आहे की, कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नाहीत. परिणामी गंभीर कोरोना रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोव्हिड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, प्लाझ्मा फेरेसिस ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. प्लाझ्मा फेरेसिस साठी वापरले जाणारे एक अत्याधुनिक मशीन आहे. या मशीनचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये फक्त प्लाझ्मा घेतला जातो व बाकीचे रक्त प्लाइमा दान करणाऱ्या व्यक्तीला परत दिले जाते. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित असून ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच केली जाते. प्लाझ्मा दान करणारी व्यक्ती 18 ते 60 वयोगटातील असावी. प्लाझ्मा देणाऱ्या कोरोनामुक्त व्यक्तीची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी व इतर चाचण्या केल्या जातात आणि जर ती वैद्यकीयदृष्ट्या पात्र असेल तरच त्या व्यक्तीचा प्लाझ्मा घेतला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी साधारण दीड ते दोन तास लागतात. प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीस अजिबात अशक्तपणा अथवा थकवा जाणवत नाही. म्हणून सर्व करोनामुक्त व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यास पात्र असल्यास प्लाझ्मा दान करुन गंभीर करोना रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!